मारिच

June 14, 2009 at 12:41 am (Uncategorized)

आश्रमात कैवल्यनं हिंडून फिरवलेल्या धुपाचा वास हळूहळू कमी होत, हवेत विरत होता. भिंतीवरच्या बापूंच्या तसबिरी त्यामधून आपलं अस्तित्व दाखवू लागल्या होत्या. झाडलोटही पूर्ण झाली होती. एकंदरीत येणाऱ्या भाविकांसाठी आश्रम तयार होत होता.

कैवल्यची सकाळची लगबग चालली होती. जाजमं, सतरंज्या, प्रसादाचं गूळखोबरं, बापूंचं उच्चासन…. सारीच व्यवस्था पहायला लागणार होती. अकरा वाजता सत्संगाची वेळ होती. कैवल्य एकेके तसबीर पुसत होता. प्रत्येक तसबिरीत बापूंची एकेक वेगळीच भावमुद्रा उमटली होती. एकीत भक्ताला आशीर्वाद देताना उमटलेले अष्टसात्विक भाव होते, तर दुसरीत जगन्नियंत्यासमोर लीन झालेले बापू दिसत होते. सत्संगाला जमलेल्या हजारो श्रोत्यांसमोर तल्लीन होऊन प्रवचन करताना बापूंचा मोठा ब्लो आऊटतर आख्खी भिंत व्यापून होता. सगळ्या तसबिरी पुसून झाल्यावर काहीशा समाधानानं त्यानं हॉलकडं नजर टाकली. अचानक त्याचे डोळे एका व्यक्तीवर खिळले. सकाळीच कोणी साधक उपासनेत रममाण झालेला दिसत होता. आसपासच्या जगापासून अलग होऊन, विसरून, पद्मासनात बसून त्यानं नासिकाग्रावर केंद्रित केलेलं लक्ष कळत होतं. कैवल्यनं थोडं निरखून पाहिलं, त्याचा अंदाज खरा ठरला. साधकाच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.

आश्रमात अर्थात हे दृष्य नवीन नव्हतंच. बाहेरच्या जगात जगण्याचा, रहदारीचा, संघर्षाचा वेगच इतका तीव्र झाला होता, की आश्रमात आल्यावर लोकांचे ताणतणाव जाहीर रीतीनं उमटायचे. बाहेरच्या जगात एकटे ‘पिणारे’ जसे वाढले होते. तसे इथे साधक वाढले होते. मनातले विकल्प बाजूला सारुन कैवल्यनं पुन्हा एकदा प्रसादाच्या तयारीवर नजर टाकली. तोवर साधकाची उपासना संपली होती. यथावकाश उठून कैवल्यकडे पाहून त्यानं एक मंद स्मित केलं. कैवल्यनंही काहीसा नम्र प्रतिसाद दिला.

“मी राजपाठक. बापूंचा भक्त आहे”. कैवल्यशी हात मिळवत त्यानं आपली ओळख करून दिली. “मी कैवल्य. आय कोऑर्डिनेट बापूज सत्संग प्रोग्रॅम्स.” बोलता बोलता कैवल्यनं काहीशा कुतुहलानंच साधकाकडं पाहिलं. नाक एकदम शार्प. चेहऱ्यावर साधनेतून आलेली शांती आणि डोळ्यांतून ओसंडणारी बुद्धिमत्ता.
राजपाठक पुढं सांगत होते, “आय गॉट टू नो बापू इन हिज मुंबई डिस्कोर्सेस लास्ट इयर. ग्रेट गुरु….. मला त्यांच्या बोलण्यातून सगळी दिशाच एकूण सापडली”
कैवल्य स्वतः उच्च्शिक्षित होता. त्यामुळे तशा प्रकारचे कुणी साधक आले की त्याला अधिक जवळीक वाटायची. “खरं तर, ” राजपाठक म्हणाले, “आज मी आलो होतो, कारण बापूंच्या कार्याला थोडासा आर्थिक हातभार लावण्यासाठी. आजवर खूप प्रेरणा मिळालीय त्यांच्याकडून.” ते सद्गदित झाले होते. कैवल्यनं हलकेच त्यांच्या पाठीवर हात ठेवला. “बापूंना परतफेडीची अपेक्षा नसते, राजपाठकसाहेब.साधकांनी आपली जास्तीत जास्त उन्नती केली की त्यांना पोचतं सगळ.”
राजपाठकांनी डोळे पुसले. काहीशा खोल आवाजात ते म्हणाले “हो; पण तरीही…. इथं व्यवस्थापक किंवा कोणी हिशेबनीस असे कोणी आहेत का? देणगीची पावती देऊ शकतील असे?”
कैवल्यनं हातानंच दिशा दाखवली. “उजवीकडची दुसरी खोली. अकाउंटंट चौबळ आहेत. ते पावती देतील तोवर मी प्रसाद घेऊन आलो तिकडेच.”

कैवल्य प्रसाद घेऊन येईपर्यंत चौबळांनी पावती तयारही केली होती. प्रसाद देताना कैवल्यनं सहज नजर टाकली आणि तो जरासा दचकलाच. एक लक्ष रुपये नगद, आश्रमाच्या गोशाळेसाठी राजपाठकांनी दिले होते. चौबळही काहीसे अवाक होऊन त्यांच्याकडे पहात होते. काहीसं चाचरुन ते म्हणाले, “सर, इंकमटॅक्स रिफंड होईलच ८० जी खाली. बाय द वे, आपला कसला बिझनेस आहे सर?”
राजपाठकांनी स्मित केलं “या डिव्हाईन वातावरणात या गोष्टी कशाला.. प्लस इटस अ व्हेरी टेक्निकल अफेअर. बस! इतकंच म्हणूयात की बापू की कृपा है. भेटू” पुढच्या क्षणी ते निघालेही होते.

अशा देणग्या तर सर्वदूर पसरलेल्या अशा कार्याला लागतातच. कैवल्यला बापूंच्या हिंदी सत्संगातलं एक वाक्य आठवलं, “कोई देनेवाला आनाही है तो उसे अपने खुद की इच्छा से आना है. और ईश्वर भेजताभी है ऐसे लोग. आश्रमवासी को जाके हाथ फैलानेकी जरुरत नही”
हिंदीच काय, बापूंच्या मराठी, गुजराठी आणि इंग्रजी भाषेचंही वक्तृत्वातलं ओज अमोघच होतं.
आज असंच काहीसं होऊन गोशाळेच्या कैक राहून गेलेल्या गोष्टी राजपाठकांच्या देणगीमुळे मार्गी लागणार होत्या. गोठे अद्यावत करायचे होते, फरसबंदी, पाण्याचे नवे हौद बांधायचे होते – सगळंच. चौबळ बापूंशी बोलतीलच. कैवल्य पुढच्या तयारीसाठी उठला…

गेल्या काही वर्षांमध्ये बापू सर्वेसर्वा असणाऱ्या त्यांच्या संप्रदायाचं नाव पुष्कळच नावारुपाला आलं होतं. भक्तसंप्रदायामध्ये जणू एखादं कुटुंब असल्यासारखी आपुलकी होती. हेवेदावे, राजकारण याला कुठेच स्थान नव्हतं. बाहेरच्या जगातल्या याच तर गोष्टींना कंटाळून साधक इथं यायचे. बापूंनी घालून दिलेली जीवनशैली, त्यांचा शब्द पाळला की झालं. निव्वळ योगिक – पारलौकिक पद्धतीपेक्षाही रोजच्या आयुष्यातले ताणतणाव झेलण्याची बापूंची सिद्धहस्त शिकवण साधकांना लुभावून जायची.
भौतिक कार्यही विस्तारलं होतं. आश्रमाची कैक एकर नैसर्गिक शेती होती. भात होता फळबागाही. गोशाळा तर आता अत्याधुनिक होत होतीच. तरुण मुलांवर संस्कारांसाठी एक कायमस्वरुपी केंद्रही होतंच. बापूंच्या मिशनची एक शाळा आणि कॉलेजही होतं. नर्सरी होती.

आश्रमाची आर्थिक बाजूही अशा एकमेकाला पूरक उद्योगांमुळे सुस्थितीत होती. बापू एकट्यानं पूर्णपणे या गोष्टींची आर्थिक बाजूदेखील सांभाळत. शाळा – कॉलेजाच्या वसतिगृहाला धान्य, फळ.म, भाज्या शेतीच्या उत्पादनातून विकल्या जात. दूधही तिथं गोशाळेतून पुरवलं जाई, तर तिथलंच शेणखत शेती संस्थेला विकलं जाई.
प्रत्येक स्वायत्त केंद्रं एकमेकांशी आर्थिक व्यवहार करण्याइतकी सक्षम होती. बाहीरुन टेंडर्स मागवणं किंवा बाहेरचे पुरवठादार यांची गरजच भासायची नाही फारशी. अगदीच बांधकाम किंवा संगणक पुरवठा अशा गोष्टी वगळल्या तर.
महिन्याभरात राजपाठक पुन्हा आलेले कैवल्यला दिसले. त्यांची सकाळची साधना झाल्यावर कैवल्य मुद्दाम त्यांना भेटायला आला. “मंगल प्रभात, राजपाठक साहेब. काय म्हणताय?”
थोड्याशा नाराज सुरात ते म्हणाले ” धंद्याची धावपळ. महिनाभर परदेशात होतो. आश्रमाचं दर्शन नाही त्यामुळं बेचैनी आली. बापू इथंच आहेत की परदेशदौरा?”
“इथंच आहेत…. बसा, दूध घ्या.”
“कैवल्य, तुम्हाला सांगतो. खूप अस्वस्थ झालं. तशी रोजची साधना तर होती चालू, पण या जागेचं म्हणून जे मार्दव, जी ऊब आहे, ती वेगळीच. मी तर शेवटी ठरवलं… याच शहरात माझं ऑफिस उघडतोय.”
“काय सांगताय? कुठं?”
“मेहेर पार्क एरिया. एक-दोन दिवसांत कामं संपवून उद्घाटन. उद्घाटनाला नक्की या.”
कैवल्यच्या मनात आलं, हा इतक्या वरच्या दर्जाचा माणूस आहे…. ऐरागैरा मनुष्य इतक्या उच्चभ्रू वस्तीत ऑफिसचं स्वप्नही पाहू शकला नसता.
“चौबळ… आहेत का?” राजपाठकांनी विचारलं
“येतीलच… बापूंबरोबरच बसलेत. तुम्हाला भेटायचंय का?”
“हां… बापूंच्या कृपेनं त्यांच्या वास्तव्याच्या – आश्रमाच्या गावात ऑफिस झालंय. त्यानिमित्त आश्रमाला फूल ना फुलाची पाकळी देण्याचं डोक्यात आलं.” राजपाठक खरोखर सद्गदित झाले होते. कैवल्य काही न बोलता त्यांच्याजवळ बसून राहिला.

दहा मिनिटात चौबळ आलेच. कैवल्यला काही अंदाजच लागेना. कारण या वेळी राजपाठक मिशनच्या कॉलेजसाठी दोन लाख घेऊन आले होते. काही मॉडर्न सॉफ्टवेअर आणि बरेचसे संगणक लागणार होतेच. त्यासाठी हे पैसे पुष्कळच कामाला येणार होते.
पावती घेऊन राजपाठक उठले, तेंव्हा कैवल्य दारापर्यंत त्यांना सोडायला आला.दारावर अचानक राजपाठकांनी कैवल्यच्या खांद्यावर हात ठेवला.
“कैवल्य, बापूंबरोबर सत्संगासाठी त्यांचा व्यक्तिगत वेळ मिळेल का… एक पंधरा मिनिटं फक्त.”
कैवल्यला खरंच वाईट वाटलं; पण बापूंनीच सांगितलेली शिस्तही पाळणं आवश्यक होतं “राग मानू नका, सर…. पण साधकांशी व्यक्तिगत संपर्क अलीकडे बापूंनी खूप कमी केलाय. खूप म्हणजे खूप. माझी-त्यांचीही गाठभेट नाही दोन महिन्यात. तरी एक काम करु. तुम्ही आश्रमकार्याला एवढी आपुलकी दाखवता… मी निदान विचारुन पहातो. या लवकर परत.”

राजपाठकांचं ऑफिस सुरुही झालं. बरंचसं काम ते तिथूनच बघत. त्यामुळे आपसूकच त्यांची आश्रमसाधना वाढली. पुढच्या दोन महिन्यात राजपाठकांची पुढची देणगी पुन्हा आली. चार लाख. न रहावून कैवल्यनं त्यांना तेंव्हा विचारलं…. “सर, मला तुमची ऍक्टिव्हिटी एकदा समजावून सांगा ना… मला कळेल, मीही इंजिनिअरिंगचा डिग्री होल्डर आहे.” कारण त्यांची ओळख आतापर्यंत चांगली वाढली होती. पण कुठलीच व्यावसायिक चर्चा त्यांना आश्रमात नको असायची. त्याला अडवून ते म्हणाले, “तो प्रश्न नाही. नॉट हिअर इन द डिव्हाईन प्रिमाईस…. यंग मॅन, तू ऑफिसवरही आला नाहियेस…. तिकडे ये. मग बोलू.”

पुढच्या महिन्यात राजपाठकांनी कमालच केली. त्यांना कुठलंसं आंतरराष्ट्रीय इंफ्रास्ट्रक्चरल कॉंट्रॅक्ट मिळाल्याप्रित्यर्थ आणखिन चार लाखाची देणगी त्यांनी आश्रमाकडे सुपूर्त केली. कैवल्यला तेंव्हा मात्र वाटलं, की बापूंची आणि यांची भेट आता व्हायलाच हवी. नाही म्हटलं तरी राजपाठक, बापूंचे या शहरातले, कदाचित राज्यातलेही सर्वात मोठे देणगीदार ठरत होते.
सगळी हकीकत ऐकल्यावर बापूंचे हात आपसूक जोडले गेले. “हरी की क्रिपा… कैवल्य! कुठले आहेत हे साधक मूळ?” कैवल्यनं मग त्यांना सगळंच सांगितलं. आश्रमाला जवळ राहून साधनेची त्यांची खटपट, काही प्रमाणात त्यांच्या धंद्याचं थोडंसं गूढ राहिलेलं तांत्रिक स्वरुप, सगळंच.

“खूप दिवस झाले, बापू…. आपसे मिलने की बिनती कर रहे हैं. बापू, मलाही वाटतं, तुमची कृपा त्यांच्यावर व्हावी. द्याल का त्यांन एक दहा मिनिटं?”
बापू मृदू हसले. “ठीक आहे, कैवल्य. इतकं केलेल्या साधकाचा तेवढा अधिकार निश्चितच आहे, बुला लो!”
“आज्ञा प्रमाण, बापू!”

दुसऱ्या दिवशीच तो राजपाठकांच्या मेहेरपार्क ऑफिसला पोचला. ऑफिसच्या रचनेत त्यातली समृद्धी कळत होती. भपका कुठंही नव्हता. प्रथमदर्शनी बापूंची एक मोठी तसबीर. चार पाच केबिन्स…. पूर्ण ऑफिस सेंट्रली एअरकंडिशंड, पाचसहा स्टाफ…. प्रत्येकाला संगणक. राजपाठकांचा बातमी ऐकल्यानंतरचा आनंद कैवल्यला अपेक्षित होताच. दुपारी चारची वेळ ठरली होती. बातमी ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
“आईये श्रीमान, आईये…. बसा आपण” बापूंनी प्रेमभरानं त्यांना आपल्या जवळ बसवून घेतलं. “साधना तो चल रही है ना? निरंतर चलनी चाहिये. साधना हीच प्रक्रिया माणसाचं जीवन उजळवते.”
राजपाठकांनी बापूंना नम्रपणे नमस्कार केला. “फर्स्ट आय हर्ड यू इन मुंबई बापू… आजचा दिवस केंव्हा येईल हीच आस होती. सब आपकी दुवा बापू, सब आपकी कृपा.”
बापूंनी त्यांच्या डोक्यावर प्रेमभरानं हात ठेवला. “कृपा आमची नव्हे साधक. परमात्म्याची. आमच्या फक्त सदिच्छा. रामकृष्ण हरी! पण साधक, आश्रमासाठी तुम्ही इतकं सगळं करताय. आप व्यावसायिक हो. व्हॉट डू यू डू फॉर अर्निंग?”

राजपाठक गंभीर झाले. खूपच गंभीर. त्यांनी खिशातून कार्ड काढताना एक प्रदीर्घ सुस्कारा टाकला. ” तुमच्यापासून लपवून काय ठेऊ बापू….. इटस अ रादर पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी…. फार बाहेर बोलताही येत नाही”
बापू हसले. त्यांच्याही भक्तांमध्ये सगळ्या प्रकारचे लोक असत, हे त्यांना माहिती होतं. “इतनी गुप्तता, साधक…. आपण अपवित्र तर काही नाही ना करत?”

“बापू… पवित्र, अपवित्र तुम्हीच ठरवा. खूप टेन्शन्स असणारा व्यवसाय आहे माझा. मोठेमोठे राजाकारणी, त्यांचे ट्रस्टस, इंडस्ट्रियल टायकून्स यांचे नं २ चे बेहिशेबी पैसे मी परदेशात सुरक्षित फायद्यात गुंतवून देतो. त्यांचे तिकडचे प्रॉफिटस भारतात; पण जास्त करुन फॉरेन कंट्रीमध्ये मॅनेज करतो. आयल ऑफ मान, पनामा, स्वित्झर्लंड या देशामध्ये. खेळ मोठा आहे, पण दोन्हीकडून धोका. सततची टेन्शन्स… इसिलिये मन:शांती की उम्मीद रखके यहाँ आता हूं. मी आहे इन्व्हेसटमेंट एक्सपर्ट आणि चार्टर्ड अकाउंटंट…. तरी टेन्शन रहातंच.” एका दमात राजपाठकांनी आपली व्यथा ऐकवली. क्षणभर बापूंनी डोळे मिटले. अशाच तर अनेक मंडळींना अंतर्गत शांततेची आस, सहानुभूती, वात्सल्याची आस जास्त असते, हे आत्तापर्यंत त्यांना चांगलं ज्ञात होतं.

“राम कृष्ण हरी!” ते म्हणाले. “पण साधक, तुम्ही यात आहात, याला आपल्या देशातले आर्थिक कायदेकानू जबाबदार आहेत, जे अशा इन्व्हेस्टमेंटस मजबूर होऊन या लोकांना करायला भाग पाडतात. सारा दोष अपने सरपर क्यूं लेते हो?” राजपाठक काहीसे सावरत होते. डोळे मिटून बापू पुन्हा चिंतनात गेले.

खरंतर त्यांच्या मनात एक वेगळा विचार चमकून जात होता. गोशाळेपासून ते मिशनच्या कॉलेज पर्यंत आणि श्रीलंकेपासून नॉर्वेपर्यंत पसरलेलं त्यांच्या आश्रम – मिशनचं अवाढव्य विश्वही याच, अशाच प्रश्नात अडकलं होतं. त्यांच्या विविध संस्थांच्या एकमेकांमध्ये झालेल्या व्यवहारांमध्ये सुमारे साठ लाख रुपये असे काही निर्माण झाले होते, जे कुठंच दाखवता येत नव्हते. प्राप्तिकर काय, चॅरिटीवाले काय, आजवर शांत राहिले…. उद्याची काय शाश्वती? आता निदान हे कळू शकणारा, त्यांच्याच पंथाचा माणूस त्यांच्यासमोर होता. खुणेनंच त्यांनी राजपाठकांना बाहेर एक पाच मिनिटं थांबायला सांगितलं.

हीच तर सुविधा, सोय आश्रमालाही हवी होती. बापूंच्या मनात विचारांचं मोहोळ उठलं. हे काम या साधकाला सांगण्यात तो गुरुस्थानी मानतो, अशा बापूंवरची त्याची श्रद्धा डळमळीत होण्याचाही संभव होता. पण त्याच वेळी ही अडचण समजून घेऊन सोडवू शकणारीही हीच व्यक्ती होती. याच शहरातून त्याचं कार्यालयीन कामकाजही चाललं होतं. ही पण एक जमेची बाजू होतीच. याच माणसानं आश्रमासाठी पूर्ण ताकदीनिशी निधीही लावला होता. बापू उठून बाहेर आले. राजपाठक बसले होतेच. “कुछ देर के लिये अंदर आओगे, साधक?” बापूंनी त्यांना आत बोलावून दरवाजा बंद केला. “आपल्या आश्रमाचीही अशीच एक मुश्किल आहे, साधक. आप कुछ करोगे?”

राजपाठक काहीसे संभ्रमित होऊन ऐकत होते. “घबराओ नही….” बापूंनी शांत, पण खंबीर आवाजात सुरुवात केली. “इथं अशीच काहीशी स्थिती आहे. ऍज यू सेड, आश्रमसंस्थांच्या व्यवहारात कुल साठ लाख रुपये, ऐसे कुछ जम गये हैं…. न कुछ हिसाब दे सकते हैं चॅरिटीवालोंको, ना किसी बँक में जमा कर सकते हैं. आपकी जो भी गतिविधियाँ, मोडस ऑपरेंडी है, ती वापरा. द्रव्य आहे, चांगल्या जागी जाऊ दे.” आता प्रश्नचिन्ह बापूंच्या डोळ्यात होतं.

राजपाठकांनी थोडा विचार केला. “हां बापू, करता तर येईल. मागं सुरेश योगी फाऊन्डेशनच्या स्विस ब्रँचसाठी मी काम केलंय. दे हॅड अ सिमिलर प्रॉब्लेम. करन्सीज कैसी है बापू?” त्यांनी विचारलं.
बापूंनी उठून आपली अलमारी उघडली. बरेचसे भारतीय रुपयेच होते; पण डॉलर्स आणि युरो अगदीच कमी नव्हते. त्यांनी हा अंदाज घेईपर्यंत राजपाठकांनी आपली आपली अगदी उंची कातडी ब्रीफकेस उघडली. “मी हे करणार ते मोस्टली स्विस आणि ऑस्ट्रीयन कॉर्पोरेट कंपनीज… बापू, एनी ऑफ अवर ऍक्टिव्हिटी इन स्वित्झर्लंड?” बापूंनी मान हलवली, “अभी तक नही, नेक्स्ट इयर मे बी.”
“ठीक आहे. बापू, या कॅशची तर रिसीट आताच माझ्या सहीनं मी तुम्हाला देतो. सिर्फ आप किसी को नही दिखाना!” राजपाठक सांगत होते. “अनादर थ्री – फोर डेज, उन कंपनियोंके नाम और फिक्स डिपॉझिट रिसीटस आय विल गेट फॉर यू. किसी और जगह रखना. नॉट हिअर.”

बापूंना आश्चर्य वाटलं. “इतनी जल्दी? सिर्फ चार दिन?”
“हां बापू. हे मी घेऊन गेल्यावर दुपारीच वर्क आऊट करुन माझे बाहेरचे फंडस उद्याच फोननं तिथं इन्व्हेस्ट करणार. अनफॉरच्युनेटली इंडिया में इसे हवाला बोलते है… पण बापू,” ते अजिजीनें म्हणाले, “हीच सिस्टिम सर्वात फास्ट आणि एफिशियंट आहे.” त्यांनी आर. पी. फिनान्स कार्पोरेशनचं रिसीट बुक काढलं. “कुछ साठ लाख लिख दूं, बापू?”
“हां, साधक.” राजपाठकांना बॅग कॅशसह देऊन बापूंनी त्यांनि दिलेली रिसीट कुलूपबंद केली. राजपाठकांनी बापूंना पदस्पर्श केला. “बापू, तुमचा फार वेळ घेतला का?”
बापूंनी त्यांना आशीर्वाद दिला. “नाही पंथिक…. आपनेही हमारी बडी चिंता मिटाई है. चार दिवसांनी महासत्संग सप्ताह आहे…. आप आईये जरूर.”
“जी हाँ, बापू. सब आपकी कृपा है, बापू” राजपाठक निघाले.
महासत्संगाच्या पहिल्या दिवशी राजपाठकांना बापूंशी काहीच बोलता आलं नाही. दुसऱ्या दिवशी कैवल्य त्यांना भेटला. अंगात ताप असूनही ते आले. त्याही दिवशी बापूंची भेट अशक्य होती. त्यांच्या तब्येतीची काळजी वाटून, प्रसाद घेऊन कैवल्य पाचव्या दिवशी त्यांच्या ऑफिसवर गेला. अत्यंत आश्चर्य वाटून त्यानं आसपास पाहिलं. ऑफिसची जागा पूर्ण रिकामी होती. ना कुठला बोर्ड, ना कॉंप्युटर्स, ना एसी. आसपास कुणालाच काही माहिती नव्हतं. काहीतरी विचित्र वाटून परत आल्यावर बापूंना त्यानं ही बातमी सांगितली, तेंव्हा त्यात राजपाठकांबद्दलच्या काळजीचा भाग जास्त होता. फक्त हे ऐकून बापूंच्या डोळ्यांत सेकंदभर जी क्रूर विखारी चमक होती, ती त्याला फार विसंगत वाटली. बापूंनी त्याला सांगितलं, की त्यांना अर्धा तास एकांत हवा होता.

आजवरची संपूर्ण साधना विसरायला लावणाऱ्या अपरिमित क्रोध आणि संतापानं बापूंना काही काळ ग्रासलं. आपली पूर्ण अध्यात्मिक ताकद पणाला लावून ते काही काळ एका जागी बसले. केवळ अकरा लाख रुपयांत कैवल्यचा, बापूंचा विश्वास संपादून, हा महाकपटी माणूस त्यांना साठ लाख रुपयांना गंडा घालून फरार झाला होता. अक्षरशः उचलून घेऊन गेला होता.

काय ते सद्गदित होणं, डोळ्यातले अश्रू, साधनेचं नाटक….. पूर्ण छलकपट. आणि मुख्य म्हणजे अशा अध्यात्मिक संस्थांकडं इतपत आर्थिक, बेहिशेबी संपन्नता असणार, ही त्याला पूर्ण खात्री होती. तिच्याच जिवावर, आपला डाव तो एखाद्या कुशल जुगाऱ्यासारखा खेळला होता. हा मायावी राक्षस, बापूंना भुलवत भुलवत मोहाच्या त्या टोकापर्यंत घेऊन आला होता. बरं काही कायदा, पोलीस किंवा बाहेरुन मदत घ्यावी तर साठ लाख रुपये आणले कुठून, हे सांगावं लागणार, षटकर्णी होणार.

परिस्थिती मान्य करुन बापू उठले. त्या दिवशीच्या सत्संगात त्यांनी मारिच, त्यानं घेतलेलं कांचन मृगाचं रुप आणि त्या मोहानं प्रत्यक्ष प्रभूंचं झालेलं नुकसान याचं रसाळ विवेचन श्रोत्यांसमोर केलं. विषयातली त्यांची तल्लीनता श्रोत्यांना विशेष सुखावून गेली.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: