इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी

June 14, 2009 at 12:53 am (Uncategorized)

आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर सुधन्वा दिवेकर ग्लासमध्ये कडक कॉफी ओतून, तो समोर ठेवून विचारमग्न अवस्थेत बसला होता. एखादी अत्यंत नवीन, महत्त्वाची कल्पना कुणासमोर मांडायची असली की तो आधी अर्धा एक तास असाच तंद्रीत बसायचा. आज त्याची अकरा वाजताची वेळ ठरली होती. तीही शिक्षणचुडामणी बाळासाहेब कलंत्रे यांच्याबरोबर.

काय बोलायचं हे दिवेकरचं खरंतर बऱ्यापैकी ठरलेलं, घोटलेलं होतं. कारण या प्रकल्पावर चार एक महिने बारकाईनं विचार करुनच शिक्षणचुडामणींशी या विषयाचें सूतोवाच करण्याचं धाडस त्यानं केलं होतं. त्यातच गेल्या चार दिवसांत आपल्या प्रकल्पाची समाजातली गरज त्याला याच त्याच्या नेहमीच्या हॉटेलवर फक्त दुसऱ्या टेबलवर झालेल्या एका संभाषणामुळं फार प्रकल्पानं जाणवली होती. एक निश्चयी सिगरेट दिवेकरनं पेटवली. तिचे खोल झुरके घेताघेता ऐकलेलं ते संपूर्ण संभाषण, एखाद्या पटकथेसारखं पुन्हा एकदा त्याला मनात आठवून गेलं.

झालं होतं ते असं. हॉटेलमध्ये शेजारच्या टेबलवर त्या भागातले एक समाजहितरक्षक बसले होते. दिवेकरला लोक दहा वर्षांपूर्वी त्यांना ‘गुंड’ म्हणायचे हेही अंधुक आठवत होतं. असं का म्हणायचे कुणास ठाऊक. चौकातल्या किरकोळ हिंसाचारानं सुरवात करून समाजहितरक्षक आज आपल्या भागात चांगलेच प्रस्थापित झाले होते. फटाक्यांचा स्टॉल, मग एक (अतिक्रमण करुन) काढलेला पावभाजी-ज्यूस बार, एक फोन बूथ असं करत करत पेंटिंग कॉंट्रॅक्टस घेणे, वीटभट्टी असा त्यांच्या उद्योजकतेचा यशस्वी आलेख होता. राजकारणामध्येही त्यांची प्रगती याबरोबरीनंच होत गेली होती.

त्यांच्यासमोर टेबलवर अगदी त्यांच्यासारखेच पण दुसऱ्या भागातले असे आणखी एक समाजहितरक्षक बसले होते. समदुःखी किंवा खरं तर ‘समसुखी’ असल्यामुळे त्यांच्यात विलक्षण मोकळेपणाने अनुभवांची देवाणघेवाण चालली होती. शेजारीच त्या दोघांनी पाळलेला वनराज नेने हा झुंजार पत्रकारही विनम्रपणे बसला होता आणि त्यांचें बोलणं विशेष इच्छा नसूनही शेजारच्या टेबलवर दिवेकरला आपसूक ऐकू येत होतं – कारण साक्षात लोकनेतेच असल्यामुळे अर्थातच प्रघाताप्रमाणे समाजहितरक्षकांचा आवाज हा जरुरीपेक्षा फारच मोठा होता. दोघांचाही.

“बरं झालं दादा तुमी त्या शिवा खाडेला टोले टाकले. मागंच मी म्हनलेलो, दादांच्या एरियात इतकी डांगडिंग करतंय हे खाडं, आणि दादा एकदम सायलेंट कशे बसले? डाऊन झाला आसंल आता खाड्या”

“हे बघ शेषराव, आपन हून तर कुनाला हात नाय लावत. तुला नॉलेज आहेच. तसली भाईगिरी करायचीच नाई आपल्याला. खाडेचं म्हणजे कसं झालं, आपल्या एरियात डॉनगिरी केली चालू. आपन एक घिऊ आयकून… कसं म्हनजे, आपलं पक्कं असतं – इलेक्षनची लाईन डोक्यात. ट्रबल झालं छोटंमोठं, ऐकून घ्यायचं. पन आपली पोरं… कार्यकर्ते? यंग ब्लड पडतंय त्यांचं. कसं.. मला म्हनले दादा, काढायचं आता खाड्याचं आडिट एकदाच. आता तुला म्हायतिय पोरं हायती हाताशी म्हनून आपलं एकदम केअरफ्री चालतंय. त्यानला डायरेक नाही म्हनता येत नाही. एरियातले चार नाही, चांगले सहा-सात चौक मॅनेज करतात. निस्ता आवाज दिला ना, ब्येडमधनं पन उठून येतात. त्येंच्या मताला किंमत द्यायला लागते. ”

शेषरावनं एक सुस्कारा टाकला. “खरं हाये दादाराव. पोरं पन काई म्हना, सांभाळली राव तुमी. आमच्याकडं पोजिशन अजूनच बेकार. पोरंच मिळत नाहीत. आमच्या एरियात एकतर तुमच्यासारखी उत्सवाचा जोर नाही. सगळे झाले एज्युकेटेड. वर्गणी कलेक्शन एकदम डाऊनमध्ये. मग पोरांना जोर येनार कसा? वरतून साली आमच्या एरियात प्वॉरांनी शिक्षणाची काय लाईन पकडली कळत नाई. पूर्वी दिवसभर वडापाव, च्या-बिड्या आणि संध्याकाळला क्वाट्टर येवड्यावर भागनारी प्वारं… आता कोन काय शिकतंय, कोन कुटं कामाला लागलेत. समाजशेवेत मानसं नकोत का? इलेक्शनच्या टायमाला  अन्नांनी इचारला, कुटंय फौजफाटा, काय सांगनार त्येंना? ”

झुंजार पत्रकार वनराज नेनेनं आपली मान भयंकर समंजसपणे मागेपुढे हलवली. “पण बरं का शेषराव, तुम्हीच काय, विधायक काम करू बघणाऱ्या समळ्याच सामाजिक संस्थांकडे हीच परिस्थिती आहे. तरुण, नव्या जोमाचे कार्यकर्तेच नसतात. आजकाल ना, सगळी तरुण मुलं संध्याकाळी कॉंप्युटरच्या किंवा कुठल्या तरी परीक्षेच्या क्लासला जातात. ” त्यानं माहिती पुरवली.
हॉटेलचा मालक ग्लास फुटल्यावर पोऱ्याकडं पाहतो, तसं दादासाहेबांनी वनराजकडे पाहिलं. ” वनरु, तुला कळतं का काई? तू म्हनतो तसली पोरं आमच्या काय कामाची? रिक्षावाल्याशी नाय नडता येत तसल्या चिकन्यांना. आमचे कार्यकर्ते वेगळे… तुला नाई कळनार. तू लेखफिक लिहितो, तेच बरंय. ”

पुन्हा ते शेषरावकडे वळले. “प्वारं तर लागनारच शेषराव. नाई तं तुजा वटच जाईल तुज्याच एरियात. पन तू राव, स्पेंडिंगमदी लय कमी पडतो… मला तरी वाटतं. आरे, आजकालच्या दिवसात तुला चा-बिड्या आनी वडापावमदी नडणारी प्वारं पायजेत! दिवस ऍडव्हान्स आले शेषा! तू काय इचार केला, त्यांना काय लागतं शायनिंगला? यमाहा-बिमाहा किती ठेवल्या तू? आं? चार-पाच मोटरबाईक हाताशी पायजेत. जुन्या बाजारात मिळनारी, कुटंली नाव ल्हिल्येली असतेत… हां, आधीदास, नायकी बुटं किती आनून ठेवली तू? तू पन ना, राव… ”

पुढचं ऐकण्याची दिवेकरला गरजच भासली नव्हती. बिल देऊन तो उठला होता. कारण त्याच्यातल्या उद्योजकानं एक नवीन प्रॉडक्ट रेंज हेरली होती. त्यामुळं त्याचं डोकं भराभरा चालू लागलं होतं.  एक प्रॉडक्ट म्हणून या ‘प्वारां’ ची गरज कुणी विचारात घेतली नव्हती. डिमांड तर प्रचंड होतीच. उत्सव मंडळं, राजकीय पक्ष यांच्यापासून ते कॉस्मोपॉलिटन शहरांमधील संघटित गुन्हेगारीला अशी प्वॉरं, तीही त्यांना हवी तशी प्रशिक्षित स्वरुपात मिळणं गरजेचं होतं. सर्व मार्केट सेगमेंटसना या मनुष्यबळाची गरज होती. एकद असे पावटे प्रशिक्षित झाले की व्यक्तिगत पातळीवर पैशाची वसुली करणे, भाडेकरुंना हाकलण्याच्या सुपाऱ्या घेणे अशा स्वयंरोजगारीच्या संधी होत्याच. देशातल्या बेकारीमुळं, नोकऱ्यांच्या अभावामुळं ‘कच्चा माल’ तर प्रचंड प्रमाणात उपलब्द्ध होताच. प्रश्न होता तो चाचपडत, आपापलं शिकत या क्षेत्रामध्ये येणाऱ्या तरुणाईला घासूनपुसून, प्रशिक्षित स्वरुपात व्यावसायिक पातळीवर मार्केटमध्ये उतरवण्याचा आणि अगदी हेच दिवेकर विलक्षण कुशलतेने करणार होता. या असंख्य दिशाहीन अकुशल ‘पावट्यां’ना तो एक फिनिश्ड प्रॉडक्ट म्हणून समाजासमोर पेश करणार होता.

हे सगळं आठवता आठवता हॉटेलमधून उठून मोटारबाईकवरून शिक्षणचुडामणींच्या भव्य कॅंपसमध्ये आपण कसे आलो ते दिवेकरला कळलंही नाही

दिवेकर खाली उतरला. अत्यंत घाईघाईनं त्यानं चेहऱ्यावर गांभीर्य आणि नाटकी विनम्रपणा यांच्या समसमान मिश्रणाचा एक थर चढवला आणि आत पाऊल टाकलं. अर्थातच रिवाजाप्रमाणे शिक्षणचुडामणींकडे लोक आले होते, ते बिझी होते, त्यांनी पाच मिनिटं बसायला सांगितलं होतं, वगैरे.

मोठं होऊन बसलेल्या कुठल्याही माणसाला भेटण्यासाठी जितका वेळ ताटकळणं आवश्यक असतं तेवढं ताटकळून झाल्यावर तो एकदाचा आत गेला. आत शिक्षणचुडामणी आपल्या गुबगुबीत खुर्चीत जोधपुरीत बसले होते. दिवेकरचा हात हातात घेऊन त्यांनी दिवेकरचं तोंडभर स्वागत केलं.

“या, या, या, या, दिवेकर. फार वेळ थांबलात का? चला, पटपट बोलून घेऊ. मला लगेच बुर्कीना फासो देशाचे कल्चरल आंबेसेडर आलेत, त्यांना भेटायला जायचंय. बोला”

दिवेकरनं एक सूक्ष्म आवंढा गिळला. हा बुर्कीनो फासो देश नक्की कुठं आला, असं त्याला विचारायचं होतं, पण वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. “सर, तो पावटॉलॉजी कोर्स सुरू करण्यासंदर्भात मागं बोललो होतो…. ”

“हो, हो, केला बरं का मी विचार, दिवेकर – करायचं हे आपल्याला. कल्पना तर पटलीय आपल्याला तुमची. काय अडचण दिसत नाही. नॉन ग्रॅंट बेसिसवर करु, म्हणजे मग बंधनं  नाही येणार कुठली; पण दिवेकर, माझ्या म्हणून काही शंका आहेत – तेवढ्या जर मिटवल्या तुम्ही, तर अगदी येत्या जूनलाही सुरवात करू आपण. ”

शिक्षणचुडामणींना कल्पना पटलेली पाहून दिवेकरला हायसं वाटलं. शंकांची उत्तरं द्यायला तर तो तयार होताच. गृहपाठ पक्का करुनच तो आला होता. “विचारा ना सर… तुम्ही कुलगुरू – म्हणजे त्या नात्यानं तुम्हाला क्लीयर पाहिजेच सगळं…. तरच तुमचा आशीर्वाद लाभेल ना,सर! “(वा! मस्त वाक्य! )

“मला एक सांगा, ‘पावटा’ हा शब्द तुम्ही कुठून काढला? म्हणजे… त्याचा काय अर्थ घ्यायचा? त्याच्यामागे काही उद्देश आहे का खास? ”

“आहे ना सर.. मी जरा सविस्तर सांगतो. ‘पावटा’ म्हणजे असा माणूस, की ज्याच्या कोणत्याही वागण्याबोलण्यात ‘विवेक’… किंवा, कसं सांगू, चांगुलपणा, माणुसकी, कुठल्या नात्यांबद्दल आदर असे कोणतेही गुण दिसत नाहीत…. ही व्यक्ती संपूर्ण स्वतःपुरताच जगाचा विचार करते आणि विलक्षण मग्रूर, घमेंडखोर, रगेल आणि मुजोर असते. सभ्यतेचे कोणतेच नियम ‘पावटा’ या कॅटेगरीतल्या व्यक्तीसाठी नसतात. ‘पावटे’ हे समाजातल्या कोणत्याही स्तरात असतात. नवश्रीमंत आप्पलपोट्या समाजातल्या पावट्यांना आपण ‘पंक्स’ म्हणतो इतकंच. आणि दुसरं – ‘पावटा’ हा शब्द एकदम ‘सेफ’ आहे. ”

चुडामणींचा चेहरा प्रश्नांकित झाला. “‘सेफ’ म्हणजे? ”

“‘सेफ’ म्हणजे सर, आजकाल कुठल्या गोष्टीनं कुणाच्या ‘भावना’ दुखावल्या जातील याचा काही नेम नाही. ‘पावटा’ या शब्दाला कुठल्याही विशिष्ट वय, जात, समाज, शिक्षण, वर्ग, वर्ण, व्यवसाय याचा वास नाही, बंधन नाही. खरं तर ‘पावटत्व’ या स्वभावगुणाचा परीघ इतका विशाल आहे की अशा एखाद्या वर्णनात त्या महान आत्मकेंद्रित स्वभाववृत्तीला अडकवणं हाच मुळी त्याचा अपमान आहे. पण… आपल्या कोर्सनं त्या शब्दाला प्रतिष्ठा येईपर्यंत थोडीशी काळजी घ्यायला लागणार. ‘पावटा’ या शब्दानं अमुक कुणाकडं बोट दाखवलंच जात नाही आणि त्या वृत्तीला एक विशाल परिमाणही आपोआपच मिळतं. ”

चुडामणी लक्ष देऊन ऐकत होते. “कोर्स केल्यानंतर काय देणार आपण या विद्यार्थ्यांना…. म्हणजे डिग्री, डिप्लोमा असं? ”

दिवेकर हसला. “सर, हा कोर्स करून बाहेर पडल्यावर त्यांना इतकी प्रचंड मागणी सध्याच्या समाजात आहे आणि तीही अशा क्षेत्रातून, की तिथे डिग्री की डिप्लोमा या सटरफटर गोष्टींना महत्त्वच नाहीये. आपल्या विद्यार्थ्यांचं आत्मभानचं इतक्या तेजःपुंज पद्धतीनं वाढलं असेल, की त्यांना नोकरी / व्यवसाय देणाऱ्यांना पाहतक्षणीच ‘ हेच.. हेच ते! ‘ असा आत्मसाक्षात्कार होईल. तरीही सोयीसाठी आपण त्यांना आपला एक स्वायत्त डिप्लोमा ऑफर करू आणि सर, या कोर्सपुरती तर आपल्याला स्पर्धा नाही…. वुई विल बी युनिक! ” लक्षपूर्वक ऐकणाऱ्या चुडामणींच्या उत्सुक चेहऱ्यावरच्या कुतुहलाची जागा आता प्रशासकीय विचारांनी घेतली होती. “मला सगळं नीट सांगा पण… प्रवेश कुणाला, कशाच्या आधारे देणार? अभ्यासक्रम कसा आखायचा? फॅकल्टी कोणकोण? तुम्ही अर्थात सविस्तर विचार केला असेलच म्हणा. ”

आपली बॅग उघडून दिवेकरनं अत्यंत काळजीपूर्वक एक डॉकेट बाहेर काढलं. आता ती महत्त्वाची, निर्णायक वेळ आली होती. “ह्यात सर… मी सगळं खुलासेवार लिहिलं आहे. ” ( रेट लेका दिवेकरा! महत्त्वाचं वाक्य न घाबरता रेट! तो स्वतःशी मनात म्हणाला.) “म्हणजे… सगळंच. तुम्ही आता विचारलेली माहिती तर आहेच, पण मुख्य म्हणजे रिक्वायर्ड फंडिंग आणि रेव्हेन्यू मॉडेल. म्हणजे, आपली दोघांची व्हीसी आणि डायरेक्टर म्हणून रेम्युनरेशन पण आहेत त्यात. कोर्स नुसता सेल्फ सपोर्टिंग नाही, तर चांगलाच प्रॉफिटेबल होईल सर! ” (हुश्श! पैशाचं न घाबरता बोललो! )

पैशाचा, फंडिंगचा विषय आला की उगीचच इंग्रजी शब्द वापरणारी मराठी माणसं सज्जन असतात, असं चुडामणींचं अनुभवसिद्ध मत होतं. त्यांनी डॉकेट उघडून पाहिलं. प्रस्तावना, प्रकल्पाची सामाजिक गरज, लागणारी आर्थिक तरतूद, येणारा पैसा आणि त्याचे विविध मार्ग हे सगळं खरोखर व्यवस्थित, काटेकोरपणे लिहिलं होतं. परिशिष्ट १ मध्ये प्रवेशप्रक्रियेच्या परीक्षेचा नमुना पेपर दिला होता. विचारलेले प्रश्न पर्यायी आणि वर्णनात्मक दोन्ही स्वरुपाचे होते. सहजच ते वाचू लागले.

# संध्याकाळी हूड असलेली टोपी उलटी घालणे व पाऱ्याचा गॉगल घालणे यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाला विशेष उठाव येतो असे आपल्याला वाटते का?
* नाही *होय * काय इचारता राव!

# खालीलपैकी कोणते आयुध आपण अंगावर सतत बाळगता?
* चाकू * चॉपर * चेन* बस्तर *गुप्ती

#आजवर जास्तीत जास्त किती मेगावॉटची स्पीकर भिंत आपण स्थानिक उत्सवात उभी केली आहे?
* १०० *५०० *१००० व अधिक

#सद्यस्थितीत आपले पालन पोषण कोण करतो?
*आई-वडील *स्थानिक दादा / नेता *श्रीमंत परप्रांतिय मित्र *तुला काय घेनं?

#आजमितीला किती क्षेत्रफळ (माफ करा, ‘एरिया’) आपल्या अधिपत्याखाली आहे अशी आपली खात्री आहे?
*दोन चौक *संपूर्ण वाडी *संपूर्ण (अमुक कोणताही) रोड *कंप्लेट गावात आपला टेरर है बंधो!

# हिंसाचारविषयक वर्णन करताना खालीलपैकी कोणता शब्द, शब्दसमूह आपणांस वैचारिकदृष्ट्या अधिक जवळचा वाटतो?
*तोडणे *टोले टाकणे *राडे करणे *रोवणे *टपकवणे *हितनं पैलं सुटायचं * हे सर्वच

# ‘नडणे’ आणि ‘नष्टर’ यातला फरक सुमारे पाच ओळीत स्पष्ट करा

#खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर दहा ओळींचे टिपण लिहाः
*आजवरच्या माझ्या आयुष्यातील रोमहर्षक हिंसाचार
*माझी ‘भांडनं’ का व कशी होतात?
* माझी वेशभूषा व त्याचा समाजमनावरील परिणाम

चुडामणींनी डॉकेट मिटलं. क्षणभर डोळेही मिटले. त्यांच्या वेळीच हा कोर्स उपलब्द्ध असता तर… स्वतःला सावरून त्यांनी मृदूपणानं दिवेकरकडे पाहिलं. “एक काम करु, दिवेकर. आपल्या कँपसमधील फिलॉसॉफी डिपार्टमेंटची छोटी बिल्डिंग आख्खी मोकळीच पडलीय. डिग्रीलाच पोरं येत नाहीत फिलॉसॉफीला! मास्टर्स वगैरे तर सोडाच! तिथं त्या बिल्डिंगमध्ये काढा तुमची ही झकास इन्स्टिट्यूट वेगळी. हॅ हॅ हॅ… ही पण फिलॉसॉफीच आहे, की हो. नव्या जमान्याची!! अभ्यासक्रम, काय डिग्री डिप्लोमा द्यायचा, ते तुम्ही बघा. बाकी ऍडमिशन, फंडिंग सगळं आमच्यावर सोडा, इकडं. चला, कामालाच लागा तुम्ही आता! ”

पुढे मग फारसा वेळ लागलाच नाही. मिळणाऱ्या पैशांच्या एकूण अंदाजानं की काय, दिवेकरनं स्वतःला अक्षरशः जुंपून घेतलं होतं. जुनं फिलॉसॉफी डिपार्टेमेंट रंगरंगोटी करून, नव्या फर्निचरसकट आधुनिक काळातलं हे शैक्षणिक आव्हान पेलण्यासाठी उभं राहिलं. दिवेकरची कल्पना मूर्त स्वरुपात येत होती.

त्याला स्वतःला अर्थात अनेक आघाड्यांवर एकहाती लढायला लागलं होतं. प्रेस, प्रसारमाध्यमवाले यांना ही कल्पना नवीन होती; पण एकदा गळी पडल्यावर त्यांनी ती चांगलीच उचलून धरली. एक पंधरा मिनिटाची छोटी फिल्मही दिवेकरनं सीडीवर आणली होतीच.   www.pavtology.com   वेबसाईटचं उद्घाटनही त्यानं शिक्षणचुडामणींच्या खास ओळखीमुळं थेट शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते घडवून आणलं होतं. गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश कसा जमणार या प्रश्नाचं उत्तर शिक्षणमंत्र्यांनीच दिलं होतं. ‘नेट’ लावून प्रयत्न केला की सगळं जमतं, असं भाषणात सांगून त्यांनी टीकाकारांची तोंडं बंद केली होती.

दिवेकरनं सगळ्यात जास्त लक्ष घातलं होतं ते अभ्यासक्रम तयार करण्यावर आणि ‘मानद प्राध्यापकां’च्या नेमणुकांमध्ये. थियरीसाठी त्यानं पहिल्या वर्षी सहा विषय ठेवले होते. त्याचं गेल्या अनेक वर्षांचं विविध जागांवर – पानाचे ठेले, शहरातल्या विविध भागांतले चौक, साजरे होणारे उत्सव, शैक्षणिक संस्थांच्या बाहेरची दुकानं – केलेलं निरीक्षण आता कामी येत होतं. त्यावरून त्यानं केलेलं मनन आणि चिंतन यांतून अभ्यासक्रमाचे थिअरी आणि प्रॅक्टीकलचे विषय तो पक्के करू शकला होता. कोर्स सुरू असताना विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात उपयुक्त ठरेल अशा ‘इंटर्नशिप’ साठी त्यानं विविध ‘चौकां’तल्या अनौपचारिक संघटना, नवनवी उत्सवी फॅडं समाजात रुजवू पाहण्यासाठी स्थापन केलेली अस्थायी मंडळं, स्वयंचलित वाहनचालक (भाडोत्री) संघर्ष समिती अशा काही दिग्गजांकडं विचारणा केली होती. त्यांचा प्रतिसाद तर कल्पनेपलीकडे सकारात्मक होता.

बघता बघता प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली. ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी’ चं पहिलं शैक्षणिक वर्ष दिमाखात सुरू झालं. सीटस केंव्हाच ‘फुल’ झाल्या होत्या. थिअरीच्या विषयांपैकी फक्त ‘उद्योजकता विकास’ हा एकच विषय दिवेकर सरांनी स्वतःकडे ठेवला होता; आणि त्याला कारण होतं. त्यांचे कैक मित्र ‘मांडवली’, ‘पैसे वसुली’, ‘कंत्राटी पद्धतीने मारामाऱ्या’ आदी व्यवसायांमध्ये होते. सर मूळचे उद्योजक असल्यामुळे -आधी या विषयांशी, व्यवसायांशी त्यांचा व्यक्तिगत पातळीवर घनिष्ट परिचय होऊन, मग त्यातले हे उद्योजक, कालांतराने सरांचे मित्र झाले होते.

इतर वर्गांवरही दिवेकर सरांचं बारकाईनं लक्ष असे. वर्गात घडणाऱ्या काही विचारप्रवर्तक गोष्टींमधून आपल्या शिक्षणक्रमाची समाजातली गरज त्यांना अनेकवेळा जाणवे. उदाहरणार्थ, थिअरीतलाच एक महत्त्वाचा विषय प्रा. आंजन टोकरे हे शिकवत. ‘जनसंपर्क- पोलीस, राजकीय व्यक्ती तसेच प्रतिस्पर्धी संघटनांशी सुसंवाद’ असा तो विषय होता. प्रा. टोकरे त्यांच्या ऐन उमेदीच्या दिवसांमध्ये एका व्यावसायिक समाजहितरक्षक संघतनेत ‘डेंजर टोकऱ्या’ या व्यावसायिक नावाने सुपरिचित होते. अशाच काही सामाजिक महत्त्वाच्या वादांतून एका समाजविघातक घटकाचा त्यांनी कायमचा निकाल लावला. या सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांच्या संपूर्ण भोजन आणि निवासाची जबाबदारी चौदा वर्षे सरकारने उचलली होती. त्यानंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली. तथापि मानद सल्लागार या नात्यानं अजूनही त्यांचा या क्षेत्रातील विविध संघटनांशी संपर्क होता.

तर असे हे टोकरे सर, वर्गात तन्मय होऊन विषय मांडत असताना सहजच पण अचानक त्यांचं लक्ष एका विद्यार्थ्याकडे गेलं. त्यांनी एक डोळा बारीक करून त्याच्याकडे नीट पाहिलं, आणि फर्मावलं, “तू…. रे – उठ, उभा राहा. ” विद्यार्थी उभा राहिला.
“परिमलच्या गँगला लागला होता ना तू कामाला? मग परत कुठं आला इथं एबीसीडी शिकायला, आं? ”

“लागलो होतो सर… प्रॉब्लेम झाला. यादवाड गँगवाले आमचे रायव्हल. त्यांचा एक पंटर लोनली जाताना सापडला. ऱ्हाववलं नाई. मजबूत टोले टाकले. परिमलदादा पार सटकले. चार गोष्टी कामाच्या शिक, आन ये म्हनले. फी पन त्यानीच भरली. मग आलो स्ट्रेट इथं”

सरांनी समंजसपणे मान हलवली. “पाहिलंत, भिडू लोक… डोकं सटकलं ह्याचं, आन निस्तारायला कुनाला लागलं? ह्येच्या परिमालदादान्ला. जनसंपर्कात आसं पर्सनल घेऊन चालत नाही. दादाला, भाईला.. जो कोण मेन असेल त्याला विचारल्याशिवाय आंगावर हात टाकायचा नाई… काय समजलेत? ” विद्यार्थ्यांनी माना हलवल्या. “बैस आता खाली. सांग परिमलला. मी हाये इकडं टीचिंगला म्हनून. ”

“सांगतो सर. आजच टपरीवर गाठून सांगतो. ”

राऊंड घेत असलेले दिवेकर सर बाहेर थबकून ऐकत होते. ते समाधानानं पुढं निघाले.

थिअरीपैकीच ‘मंडळे व संघटनांचे अर्थकारण व बदलते प्रवाह’ हा विषय शिकवण्यासाठी खुद्द शिक्षणचुडामणींनी स्वतः आग्रहानं दिवेकरकडं मागून घेतला होता. त्यांच्या आजवरच्या प्रवासाला तो विशेष जवळचा होता. त्यामुळे या विषयाबद्दल सर्वाधिक कळकळ, आस्था आणि अनुभवही त्यांनाच होता.

“दुसऱ्याच्या मालकीची ‘जल-जंगल-जमीन’ ही त्रिसूत्री ज्याला हिसकावून घेता आली, तो जिंकला” ते विद्यार्थ्यांना सांगत. “मग ते आपल्या मंडळाच्या ऑफिससाठी चोरून काढलेलं पाण्याचं कनेक्शन असेल किंवा होळीसारख्या सणासाठी बिनदिक्कत तोडलेली टेकडीवरची झाडं असतील, किंवा संस्थेच्या वापरासाठी हडप केलेली सार्वजनिक किंवा व्यक्तिगत जमीन. ”

याचं उदाहरण देताना त्यांचा कंठ स्वाभिमानानं रुद्ध होई. “आपल्याच कँपसचं पाहा. ही टोलेजंग इमारत आज दिसतेय तुम्हाला- पण या बाळासाहेब कलंत्र्याचा लढा नाही दिसत! काय होतं इथं आधी? नागरिकांनी ‘रिकामटेकडं’ फिरण्यासाठी राखलेली एक टेकडी, आणि शे-दोनशे झाडं! आठ आठ वर्षं पर्यावरणवादी, महानगरपालिका सगळ्यांना टांगलं, तेंव्हा कुठं ही निर्मिती झाली. ”  भावी  पावटे हे कानात प्राण आणून ऐकत.

बऱ्याच वेळा नाईलाजयुक्त आदरानं आणि व्यासंग वाढावा म्हणूनही दिवेकर सर शिक्षणचुडामणींच्या तासाला बसत. एक दिवस चुडामणी ‘वार्षिक हिशेब व ताळेबंद हिशेब तपासनिसाकडून मंजूर कसे करून घ्यावे’ याचं विवेचन करत होते. सोयीस्कर हिशेबांची मंजुरी महत्त्वाची असते हे त्यांचं मत. “संस्था, मंडळं, संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांना ऑडिटरचं भावविश्व, त्यांच्याशी बोलताना हळूहळू उलगडत गेलं पाहिजे. नेमकं उमगलं पाहिजे.” ते सांगत होते. चुडामणींचं हे वाक्य ऐकून दिवेकर सरही गोंधळले. वर्गातल्या एकाही विद्यार्थ्याच्या कानावर भावविश्व हा शब्द पडला असण्याची शक्यता नव्हती. सर्वांनीच गोंधळून चुडामणींकडं पाहिलं.

चुडामणी शांत होते. “मी समजावून सांगतो. समजा… तुम्ही गॉगल विकत घेताना, विक्रेता जास्त बोलायला लागला, तर तुम्ही काय म्हणता? ” एका सुरात दोन तीन आवाज आले, ” ए… जास्त पचपच नाय पायजे! भाव बोल! ” “बरोबर. ” चुडामणी म्हणाले, “जसा आपण तिथे भाव विचारतो, तसाच हिशेब करून सही ठोकणाऱ्याचा पण भाव असतोच. फक्त एज्युकेटेडमध्ये असं डायरेक्ट विचारायचं नसतं… बोलता बोलता, हळूहळू त्यांच्या ‘भावा’ चा अंदाज घ्यायचा. या अर्थी त्यांचं ‘भाव’ विश्व तुम्हाला उमगलं पाहिजे. ”

दिवेकर सरांनी सुस्कारा टाकला. या महनीय व्यक्तीला ‘शिक्षणचुडामणी’ हा किताब कसा प्राप्त झाला, त्याचं आणखी एक कारण त्यांना उमगलं होतं.

‘आदर्श पावट्याचे आचार, उच्चार आणि विचार’ असाही एक विषय थिअरीत होता; पण दिवेकर सरांना त्यातल्या फक्त ‘विचार’ याच गोष्टीवर थोडेफार कष्ट घ्यावे लागले. त्यांच्या असं लक्षात आलं, की उच्चार आणि आचार ही नित्यनूतन, प्रवाही आणि काळाबरोबर बदलत जाणारी ‘ट्रेंडी’ प्रक्रिया आहे. सिनेजगत, लोकप्रिय अभिनेते, खेळाडू, जाहिरातदार यांनी रुजवलेल्या अनेक शब्दसमूहांचा तो एक परिपाक आहे. उदाहरणार्थ, त्यांच्या दोन विद्यार्थ्यांना, आपल्या ठिकाणी पोचण्यासाठी दुभाजकामुळं बरंच अंतर कापून रस्त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूला बाईकवरून यावं लागणार होतं. ही समस्या उभी राहते तोच त्यातला एक जण उत्स्फूर्तपणे उद्गारला, “चल ना राव पिल्या… ‘मै हूं ना! ‘” आणि ते उलट्या बाजूने प्रचंड कर्कश्श हॉर्न वाजवत गेलेदेखील. या ‘मै हूं ना! ‘ चा अर्थ लक्षात यायला दिवेकर सरांनाच वेळ लागला होता.

किंवा त्यांच्याच विद्यार्थ्यांच्या कानावर पडलेल्या संभाषणावरून उच्चारशास्त्र या विषयाची त्यांची तयारी दिवेकर सरांना आपसूकच कळाली. एक विद्यार्थी आपण आपल्या ‘डेम’ शी कसा ‘नडलो’ हे मित्राला सांगताना त्यांनी ऐकलं. “हेवाहदच्या (सेवासदनच्या) रत्त्यावरून (रस्त्यावरुन) काल चाललेली… शिल्पा. म्हनलं आज नडायचंच. घीन घीन घीन गाडी मारत तिच्यामागं गेलो, तिला गाठला, आन बॅकहँडमधून काढून फूल दिलं गुलाबाचं… म्हनलं फ्रेंडशिप देते की नाही? ”

‘मारामाऱ्या, हिंसाचार व तोडफोड’ हाही विषय थिअरीमध्ये होताच. यासाठी मात्र त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांना बोलावणं दिवेकर सरांना भाग पडलं. विद्यार्थ्यांना याही विषयाची जुजबी तोंडओळख होती; पण त्यातला संघटित हिंसाचार, जमावाला कसं चिथवायचं, अत्यंत अल्प कालावधीत झुंडीनं एखाद्या मालमत्तेची जास्तीत जास्त नासधूस, नुकसान कसं करायचं या गोष्टी विद्यार्थ्यांना निष्णात व्यक्तींकडूनच अधिक चांगल्या समजू शकल्या. पुढील शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांना हा विषय प्रात्यक्षिकात ठेवून काही ‘अभ्यास’ भेटींचं आयोजन करावं असंही ठरलं. पिस्तुलं, एके ४७ आदी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण एक वर्षाच्या सीमित अभ्यासक्रमाच्या कक्षेबाहेरचं होतं. शिवाय प्रशिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या संधींमध्ये ते सगळं आपसूक येणार होतंच. त्यामुळे त्याचा फार बाऊ कुणीच केला नाही.

कोर्समधील प्रात्यक्षिकाच्या विषयांसाठी मात्र इन्स्टिट्यूटनं एक अत्यंत अभिनव उपक्रम राबवला. संपूर्ण शैक्षणिक विश्वातच हा  एक अभिनव, चैतन्यदायी उपक्रम म्हणून नावाजला गेला. ही क्रांतिकारी कल्पना मात्र चुडामणींची होती. कोर्सच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये जेंव्हा दिवेकर त्यांच्याकडे प्रात्यक्षिकं काय असावीत, हे विषय घेऊन गेला, तेंव्हाच त्यांच्या डोक्यात ती चमकली होती.

झालं होतं ते असं. प्रात्यक्षिकाचे विषय दिवेकरने काढले खरे; पण ते कसे घ्यायचे, ते कोण शिकवणार अशा अनेक काळज्या डोक्यात ठेवूनच, तो काहीशा सचिंत अवस्थेत चुडामणींकडे विषय दाखवायला गेला होता. त्याच्या चेहऱ्यावरुनच अनुभवी चुडामणींना काहीतरी बिनसल्याचा अंदाज आला होता.

“या, या, दिवेकर सर. काय घेऊन आले? आन काय.. तब्येत डाऊन आहे काय? ”

“नाही सर, ” दिवेकरनं प्रॅक्टिकलच्या विषयांची नवी उघडलेली फाईल त्यांच्यासमोर ठेवली. “हे  प्रॅक्टीकलचे विषय काढलेत; पण नक्की एक्झिक्यूट कसं करायचं काही कळत नाहीये. ”

“बघू आणा जरा. ” चुडामणींनी फाईल उघडली. विषय सहा होते. त्यांनी वाचायला सुरवात केली.

१. तंबाखूची पिंक लांब व प्रभावीपणे कशी टाकावी?
२. परिणामकारक ‘ढोस’ कसा भरावा?
३. ‘वाढवायचंय’ का ‘मिटवायचंय’ याचा अचूक अंदाज कसा घ्यावा?
४. वरात, उत्सव इ. प्रसंगी (अंगविक्षेपासह) बीभत्स नृत्य कसे करावे?
५. मुलींना ‘फ्रेंडशिप’ कशी मागावी? नाकारल्यास डूक कसा धरावा?
६. पावटा वाहनचालक कसे बनावे? (दुचाकी व चारचाकी)

फाईल बंद करून चुडामणींनी संमतीदर्शक मान हलवली. “झकास आहे की. काय डिफिकल्टी काय तुमची? ”

“कंडक्ट करणारी माणसं मिळायला पाहिजेत सर! ही टॅलेंटस समाजात इतकी विखुरलेली असतात, की नक्की कुणी लोकेटच होत नाही, सर. बरं, कोर्समध्ये बराच भर प्रात्यक्षिकांवर आहे. ” अस्वस्थपणे दिवेकरनं आपली अडचण सांगितली.
चुडामणींनी आपली प्रसिद्ध ‘विचारमग्न’ पोझ घेतली. म्हणजे नजर आढ्यावर, दोन बोटं गालावर ठेवून डोकं हातावर रेललेलं आणि हात खुर्चीच्या हातावर टेकवलेला. याच पोझमध्ये त्यांचे बरेचसे फोटो असायचे. फक्त फरक इतकाच, की या वेळी ते खरोखर विचार करत होते.

अल्पावधीत त्यांच्या नजरेत प्रज्ञावंताची एक प्रगल्भ चमक उमटली.

“तुम्हाला आपण प्रवेशाच्या वेळी घेतले इंटरव्ह्यूज आठवतात, दिवेकर? ”

“हां.‌सर… पण त्याचं काय? ”

“अहो… नीट लक्षात घ्या. तुम्हाला हवी ती एकेक टॅलंटस आपल्या सध्याच्या विद्यार्थ्यांमध्येच आहेत. तो गुलाबी शर्टातला कॅंडिडेट आठवतो, इंटरव्ह्यू चालू असतानाच कशी पल्लेदार पिंक मारून आला होता? गुलाबी आणि पिंक! हा.. हा.. हा.. तर ते असो. एकेकाकडे एकेक विषय तयार आहे. शिकवू द्या इतर वर्गबंधूंना त्यांनाच! नाहीतरी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यावर आपला भर असतोच. अल्प मानधनात एकेक विषय शिकवतील, उरलेले विषय शिकतील! काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ”

दिवेकरनं काही वेळ विचार केला. चुडामणींच्या म्हणण्यात तथ्य होतं. आजवर त्यानंही सगळी बॅच जवळून निरखली होती. खरोखरीच प्रॅक्टीकलचा एकेक विषय तरी एकेकाचा तगडा होताच. “बरोबर आहे सर तुम्ही म्हणताय ते! मी विषयवार माणसंच निवडायला घेतो आता. ”

आणि अशा प्रकारे प्रॅक्टीकलचीही काळजी मिटली होती.
वर्ष उत्तम पार पडलं होतं.

चुडामणींच्या केबिनमध्ये इन्स्पेक्टर (अर्थातच) प्रधान, चुडामणी आणि शिक्षण संस्थेचे आणखी एक दोन पदाधिकारी सचिंत मुद्रेने बसले होते. सगळ्यांच्या मनात काळजी, भीती आणि खेद होता – जो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. एक दीर्घ सुस्कारा टाकून चुडामणींनी खिडकीतून बाहेर नजर टाकली. इन्स्टिट्यूटचं आवार तिथून स्पष्ट दिसत होतं. निम्मा अधिक इमारतीचा भाग जळालेल्या अवस्थेत होता. उरलेल्या भागाचं प्रचंड नुकसान झालेलं कळत होतं. काचा फुटून शतशः विदीर्ण झालेल्या, बाकं बाहेर आणून उलटी फेकलेली. इतर शैक्षणिक साहित्यही संपूर्ण विल्हेवाट लावलेल्या अवस्थेत बाहेर फेकलं गेलेलं दिसत होतं. पुस्तकं अस्ताव्यस्तपणे बाहेर पसरली होती. पार कंपांउंडपर्यंत मोडतोड झालेली होती. उद्विग्नपणे चुडामणींनी नजर दिवेकर सरांकडे वळवली. मारहाणीत त्यांच्या डोक्याला टाके पडून बांधलेलं बँडेजही रक्ताळलं होतं. हात प्लास्टरमध्ये होता आणि डोळा सुजलेला होता. इतकं सगळं होऊनही फक्त त्यांचा चेहरा मात्र विलक्षण शांत होता. इतकंच काय, त्यावर एक अस्फुट स्मित आणि समाधानाची भावना होती.
“बसलाय काय शांत तुम्ही सर? कंप्लेंट लिहायला घ्या. ” शिक्षणचुडामणींना राहवलं नाही. इन्स्पेक्टरपासून सगळ्या उपस्थितांच्या नजरा दिवेकर सरांवर खिळलेल्या होत्या.

पण दिवेकर सरांनी फक्त नकारार्थी मान हलवली‌. संथ पण खंबीर आवाजात ते म्हणाले, “परीक्षेत कॉपी करू दिली नाही, म्हणून विद्यार्थ्यांनी मला मारहाण केली. कॅंपसची नासधूस केली, प्रचंड प्रमाणात केली. पण हेच, मला वाटतं कोर्सचं यशही आहे. मारहाणीच्या वेळची त्यांची भाषा, मोडतोड करतानाचा त्यांचा त्वेष, आवेश, हे सगळं मी एका तटस्थ बारकाईनं निरखत होतो. नाहीतरी पुढे जाऊन, चुकीच्या हातांमध्ये पडून, नाही त्या नेतृत्वाच्या कच्छपी लागून ही मुलं असलंच काहीतरी करणार होती. मी निदान त्यात शंभर टक्के व्यावसायिकता आणू शकलो. ”

समाधानी नजरेने त्यांनी सर्वांकडे नजर फिरवली. “दुसरी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? आज गुरुपौर्णिमा आहे.  आपण किती व्यावसायिक पावटे बनलो आहोत , हे दाखवून माझ्या शिष्यांनी मला दिलेली ही गुरुदक्षिणाच आहे असं मी मानतो. त्यामुळे पोलिसांत तक्रार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही… मी… मी कृतार्थ आहे. “

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: