साक्षात्कार
सकाळी बरोबर आठ वाजता कंपनीची गाडी घेऊन ड्रायव्हर आला. मीटिंग साडेअकराची असली तरी अडीचएक तासांचा रस्ता होता. मुख्य म्हणजे खात्याच्या साहेबांना बरोबर घ्यायचं होतं वाटेत. नैसर्गिक मूलस्त्रोत व प्रदूषण खाते, केंद्र सरकार. नवीनच निघालेलं खातं. याच साहेबांचा आणि खात्याचा, त्यातही त्यातल्या प्रदूषण नियंत्रण आणि उच्चाटन समितीचा अनेक सहकारी कारखान्यांनी चांगलाच धसका घेतला होता. प्रदूषण नियंत्रण व्यवस्था जर बसवलेली नसेल, तर उत्पादन बंद करण्याचे आदेश. एकच बरं म्हणजे ही यंत्रणा बसवून सुरू केली, तर लगेच तीस टक्के रक्कम सबसिडीच्या रुपात परत. वर तीच यंत्रणा कारखान्यातलं इंधन म्हणा, वीज म्हणा, म्हणजे एकूण कारखान्यातली उर्जेची गरज चाळीस टक्क्यांपर्यंत भागवू शकायची.
याच यंत्रणांचं परदेशी सहाय्यानं उत्पादन करणाऱ्या कंपनीत सदरहू तरुण तांत्रिक व्यवस्थापक म्हणून काम पाहात असलेला. बघता बघता आयसीएस कॉलनीला लागून असलेलं साहेबांचं घर आलंसुद्धा. त्यानं पाटीकडं निरखून पाहिलं. श्री. अमुक अमुक, मुख्य नियंत्रक, मूलस्त्रोत प्रदूषण नियंत्रण समिती. खाली आयएएस हेही आवर्जून लिहिलेलं. तरुणानं बेल वाजवली.
“सर… उशीर नाही ना झाला? ”
“नाही, नाही. मी तयार होऊन तुमचीच वाट बघत होतो. चहा घेणार? ”
“न.. नको सर. वेळेत निघतोच आहोत, तर वाटेतच थांबू कुठे तरी. ”
“ठीक, ठीक. लवकर पोचलो तर निघताही लवकर येईल. चला. ”
कार पुढे निघाली. सदरहू तरुण आता साहेबांबरोबर कारमध्ये मागे. साहेब एकूणच आयएएस श्रेणी. व्यायामानं फिट ठेवलेलं शरीर, सोनेरी चष्मा, चांगले कपडे, हलकं सेंट वगैरे प्रघाताप्रमाणे. कार वेग घेते.
“आपण कधीपासून आहात या कंपनीत? ” साहेबांची अचानक विचारणा.
“सर… वर्ष होईल आता. नुकताच कंफर्म झालो. ”
“उत्तम, उत्तम. फॅकल्टी कुठली? मेकॅनिकल इंजिनीअरिंग? ”
“नाही सर, एन्व्हायरमेंटल इंजिनीअरिंग. आपल्याच युनिव्हर्सिटीतून”
“आय सी. तुमचं… फ्रेंच कोलॅबरेशन, नाही का? ”
“सर… फिनीश- फिनलँडची कंपनी. ते लोक या सगळ्या यंत्रणा बनवण्यात फार आघाडीवर आहेत. ”
“हो… हो… त्या डेलीगेशनलाही भेटलो होतो मी. आत्ता आठवलं. ” बारीक शांतता.
तरुणाची थोडी भीडही चेपलेली. “तुम्ही सर, याच मिनिस्ट्रीत आधीपासून की…? ”
साहेबांनी खिडकीबाहेर एक नजर टाकली. छोटा सुस्कारा टाकून तरुणाकडं पाहिलं. “नाही. मी मूळचा मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री आणि कॉमर्सचा. पण पर्यावरण म्हणा, निसर्ग, प्रदूषण म्हणा, हे माझे स्वतःच्या जिव्हाळ्याचे विषय. इन फॅक्ट, मला वाटतं, पुढच्या दशकात हेच विषय महत्त्वाचे ठरणार आहेत. खात्याला तेवढ्या पॉवर्स मात्र असल्या पाहिजेत… ”
तरुणाचा अचानक संवादावर ब्रेक. एकदम फार नको. शेवटी साहेबच. तेही आता थोडे रेलून, रिलॅक्सड. गाडीनं घेतलेला सलग वेग, सलग आवाज. त्यामुळे गुंगून गेलेलं तरुणाचं मन.
मग अर्थातच त्यात वरकरणी झोप आणि आत विचार. वेगवेगळे विचार. गुप्त स्वगत. ‘साहेब सेन्सिबल दिसतोय. पर्यावरणविषयक खातं, स्वतःहून इंडस्ट्री सोडून मागून घेतलं म्हणजे अर्थात सरकारात पण काही सेन्सिबल माणसं असणार. त्याशिवाय हे खंडप्राय लफडं चाललं कुठून असतं इतकी वर्षं? आणि काय म्हणे, पुढच्या दशकात पर्यावरण महत्त्वाचं ठरणार. ठरू दे बाबा. निदान आपली गँग तरी बिननोकरीची राहाणार नाही. मग सगळे आयटीवाले झुंडीनं पर्यावरणशास्त्र शिकतील. कमाल आहे. पण आजच्या मीटिंगचं काय? फायनल निर्णय घेणार कोण? कारखान्याचा चेअरमन, नाही का? हे कोण? कसे असतील? आपल्या डोक्यात उगीच चेअरमन हिंदुराव धोंडे -पाटील का ठाण मांडून बसलाय? हे वेगळेही असतील. नाव गुलाब आबा भोंगाळे. जनसामान्यांचे आबा. गुलाबआबा. एकूण इमेज, सहमतीचं राजकारण करणारे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे, नवा विचार स्वीकारणारे, अशी. आमच्या सिस्टिम्स लवकर विकत घेण्याचा नवीन विचार स्वीकारा की. ‘
तरुणाची चांगलीच तंद्री लागली होती. तरी गुप्त विचार चालूच. ‘पण या कारखान्याकडं सध्या पैशाची वानवा आहे म्हणे. असेना, ती काळजी मार्केटिंगच्या लोकांनी करायची. आपण साईट बघायची. पण्याचा ऍनालिसिस – बीओडी, सीओडी, डीओ, टोटल सॉलिडस या फिगर्स इंजिनीअरिंग पॅरामिटर्स लावून आपल्या इंजिनिअर्सना क्षमता, म्हणजे मराठीत कपॅसिटी दिली की प्रश्न मिटला. आपलाही आणि ‘ग्रामस्थां’चाही. ग्रामस्थ! फार भारी प्रकार. गावात किंवा नदीकाठी अभयारण्य जाहीर केलं की ज्यांच्या जगण्याच्या हक्कांवर गदा येते, पर्यावरण हा ‘पुण्या-मुंबईच्या’ मूठभर लोकांचा प्रश्न ठरतो, ते ग्रामस्थ. किंवा नदीचं पाणी दूषित झालं, मासेबिसे मेले, जमीनीची सुपिकता बोंबलली की ज्यांना एकदम पर्यावरणाची आठवण येते, ते ग्रामस्थ. ‘ गुंगीतही तरुणाला स्वतःची व्याख्या आवडली. एकदम गाडी थांबल्याचा आवाज. पाठोपाठ ड्रायव्हरचाही. “चहा मारू या, साहेब. ”
तरुण एकदम जागा. “हां.. हां…. चल तू. सर, चहा घेऊ या? ”
माफक अधिकारयुक्त झोपलेले साहेबही जागे. मात्र उठताक्षणी आवाजात भारदस्तपणा कायम.
“जरुर, जरुर. कुठे आलो आपण? अरे वा.. निम्मंअधिक अंतर काटलंच.. ” शहर सोडून मोकळ्या परिसरात आल्यामुळं तरुणाला फुकटच उत्साहाचं फीलिंग. तेवढ्यात वाफाळता चहा.
“मग… रिस्पॉन्स मिळतोय का तुमच्या सिस्टिम्सना? ” साहेब.
“आता निदान सर, एनक्वायरीज येतात. पूर्वी निव्वळ सगळे लोक नदीतच सोडायचे सगळं. तुम्ही सर… ही यंत्रणा सक्तीची होण्यासाठी बरेच प्रयत्न केल्याचं ऐकलं. ”
साहेबांचं समाधानी स्मित. “हां.. आता आपल्या हातात आहे ते केलंच पाहिजे. अजूनही इंप्लिमेंट करण्यात दोन वर्षं टाळाटाळ करतातच हे कारखाने. तोवर नदीची, पाण्याची तर वाटच लागते. अहो, टू टेल यू दी ट्रुथ, या दूषित बुडबुडेवाल्या प्रदूषकांपायी, त्या पाण्यापायी जमीन ना कसायला योग्य राहाते, ना पाणी पिण्याला. देअर आर केसेस, जिथे या प्रदूषकांमुळे लहान पोरांना एका विशिष्ट प्रकारचं मतिमंदत्व आल्याचं आढळलंय. मिनामाटा सिंड्रोम वगैरे तर ऐकलंच असेल तुम्ही. फार भयानक आहे सगळं.. ”
“पण सर, बऱ्याचशा कारखान्यांची आर्थिक परिस्थिती म्हणे… ”
“अहो कसली आर्थिक परिस्थिती? मोठमोठाली गेस्ट हाऊसेस, क्लब्जपासून ते नाटका-गाण्यांचे कार्यक्रम, साहित्यसंमेलनांना स्पॉन्सरशिप, ते नवीन बॉयलर बसवणं… तिथे बरोब्बर पैसे असतात. फक्त प्रदूषण नियंत्रण म्हटलं की काखा वर. ”
“तुम्ही सर… बराच कडक स्टँड घेत असाल, नाही? ”
“कडक? बघाल तुम्ही आजच. चला निघूया. ”
प्रघाताप्रमाणं चहाचे पैसे भागवून तरुण पुन्हा गाडीत. तरुणाच्या मनात अत्यंत समाधान. कामाशी इमान राखणाऱ्या एका सरकारी माणसाशी ओळख झाल्याचं. त्यामुळे उरलेला प्रवास संपूर्ण विचाररहित झोप. अचानक कारखान्याचं आवार. ओळीत लावलेली झाडंबिडं. पण सगळीकडे पसरलेला गोडसर वास. मधूनच काही सडके भपके. रिड्यूस्ड सल्फर कंपाऊंडस.. एचटूएस.. तरुण पुन्हा अस्वस्थ.
वॉचमन. “साहेब, इकडेच डावीकडे गेस्टहाऊसमध्ये कंप्लीट व्यवस्था आहे. सगळं उरकून बारापर्यंत बोलावलंय आबानी. ”
मीटिंग. मजबूत मोठा कॉंफरन्स हॉल. क्रिस्टल ग्लासांमध्ये पाणी. मिनरल वॉटर. बोनचायना का तत्सम कुठल्यातरी भारी क्रॉकरीत चहा. काजू. बिस्किटं. पंखे असूनही एसी किंवा एसी असूनही पंखे. जणू काही कायदा असावा अशा रुतणाऱ्या खुर्च्या. मीटिंगला तरुण, अर्थातच साहेब, कारखान्याचा चीफ केमिस्ट आणि चीफ इंजिनीअर, एक दोन उत्तेजनार्थ डायरेक्टर आणि मुख्य म्हणजे संपूर्ण भारदस्त आणि मधाळ व्यक्तिमत्वाचे गुलाबआबा. बोलण्यात एखादा शब्द सोडला तर संपूर्ण शहरी पॉलिश. समोरच्याचं बोलणं एकतर भुवई उंचावून किंवा एकदम पाडून असं ऐकण्याची त्यांची स्टाईल. एकंदरीत व्यक्तिमत्व तालेवार. जोधपुरी वगैरे ड्रेस.
लगेच मीटिंगला सुरवात. भयंकर तार सप्तकातच प्रदूषणाच्या साहेबांचा पहिला लागलेला ‘सा’.
“नेहमीच्या फॉरमॅलिटीज सोडून मी सरळ विषयावर येतो. चेअरमनसाहेब, आपल्या कारखान्याला मंजुरी दोन वर्षांखाली मिळाली, ती प्रदूषण नियंत्रण व्यवस्था बसवण्याच्या बोलीवरच. सबसिडी मंजूर होऊनही वर्ष होऊन गेलं. आजतागायत यंत्रणा उभी नाही. बिनदिक्कत उत्पादन सुरू करून, दूषकं नदीत टाकून तुम्ही मोकळे. कुणी विचारलं तर तोंडावर फेकण्यापुरते परवाने फक्त घेऊन ठेवलेत. नदीत विष कालवताय तुम्ही दोनेक वर्षं. ग्रामस्थ, पर्यावरणवाले, प्रेस, सेंटर सगळ्यांना तोंड आम्ही, आमचं खातं देणार. कसं काय व्हायचं? तुम्हाला एक अकला नसतील, आम्हाला जबाबदारी आहे. हे कंपनीचे आलेत. त्यांना तुम्ही एनक्वायरीच गेल्या आठवड्यात पाठवली. काय… विचार काय? ”
आबांची ऐकताना उंचावलेली भुवई एकदम खाली आली. स्वरात जबरदस्त नम्रता. “कारखान्याची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे, साहेब. निदान शेतकऱ्यांचे पैसे तरी द्यायला पाहिजेत. पुन्हा यांच्या कंपनीच्या टर्म्स. यंत्रणा बसवतानाच चाळीस टक्के ऍडव्हान्स. तशात बँकेशी बोलून कायबाय व्यवस्था करतोय पैशाची. ”
प्रदूषण साहेबांच्या डोळ्यांत त्वेष. “मला बाष्कळ चर्चा नकोय. दोन वर्षांत आर्थिक परिस्थिती नाजूक कशी होते तुमच्या कारखान्याची? आणि पैसे नसताना तुमचं संचालक मंडळ मॉरिशस आणि दक्षिण आफ्रिकेचा दौरा टाकून आलं, नाही का? हीच यंत्रणा चालू असती, तर फ्युएल कॉस्ट, वीजबिलं कितीनं कमी आली असती? आहेत का तुमच्या इंजीनीअरांकडं आकडेमोडी तयार? शेतकरी वगैरे सोडा हो. आजवर किती वेळा तुम्ही त्यांचे पैसे वेळेत दिले, माहीती आहे आम्हाला. ”
मोठ्ठा पॉज. शांतता. आर्जवी स्वर आबांचा. “गैरसमज होतो आहे, साहेब. माझ्या मते आपल्या इथल्या मुक्कामात आपण प्रत्यक्ष काही गोष्टी बघीतल्या, बोलल्या तर जास्त… ”
“मुक्काम? ” प्रदूषण साहेबांचा आवाज गंभीर. “सोडा चेअरमनसाहेब, मला तर शक्य नाही. त्याची गरजही नाही. हे त्या सिस्टिम्स बनवणाऱ्या कंपनीचे मॅनेजर आलेत. आज-उद्या त्यांच्याबरोबर निगोशिएशन करून उद्या दुपारपर्यंत… मार्क माय वर्डस… उद्या दुपारपर्यंत यंत्रणा बसवण्याच – इन्स्टॉलेशनचं काम सुरू झालं पाहिजे. ”
त्यांच्या स्वरातला निर्धार तरुणाला जाणवल्यासारखा वाटला. “हे काम उद्यापर्यंत जर सुरू झालं नाही, तर नीट लक्षात घ्या… फक्त दोन दिवसांमध्ये… फॉर्टी एट अवर्स, आमच्या खात्यातर्फे तुमचं उत्पादन बंद करण्याचे आदेश मी स्वतः तुमच्यापर्यंत पोचवीन. आय होप, यू अंडरस्टँड. ”
तरुणाकडं वळून ते म्हणाले, “उद्या ऍनालिसिस, इनस्टॉलेशन ही कामं सुरू झाल्याचा रिपोर्ट माझ्या ऑफिसमध्ये आणून द्या.
खात्याची जीप आली असेल. मी गेस्ट हाऊसवर जाऊन, बॅग उचलून पुढं निघतो. आणखीही एकदोन व्हिजिटस आहेत. सी यू टुमारो. ”
साहेब गेलेही.
काही काळ फक्त स्तब्धता. आवाज फक्त पंख्याचा, एसीचा आणि उघडलेल्या दाराचा. तरुण काहीसा अवाक… काहीसा अवघडलेला. शेवटी आबांनीच कोंडी फोडली.
“तुमची ऑफर आणलीय तुम्ही? ”
“होय सर. टेक्निकल प्रपोजल, व्हायेबिलिटी रिपोर्ट आणि कोटेशन. तुमच्याच नावे आहे. ”
“हं. ” आबा एक क्षण विचारमग्न. “कितीची आहे ऑफर? ”
“रफली एक कोटी चाळीस लाख, सर. पण त्यापासून तयार होणारा बायोगॅसच.. ”
“अहो पण तुम्ही डिफेंड का करताय? ” आबा गडगडून हसले. “मला आयडिया पाहिजे फक्त. कितीचं प्रपोजल आहे, काय आहे, कळायला नको? अहो, तुम्ही सोडून कोण बनवतंय असलं सगळं? ”
तरुण आनंदात. “मग सर, मी दुपारी ऑर्डर घेतो आपल्या ऑफिसमधून. फॅक्स करतो. सँपल्स घेऊन संध्याकाळी लॅबला टाकतो, म्हणजे उद्याच इंजिनीअर आणता येईल साईटवर. ”
आबा शांत. प्रज्ञावंताचं हसू आणि स्थितप्रज्ञाचा चेहरा स्थिरावला समाधीत. स्थितप्रज्ञ कसा असे?
संथ सुरात ते म्हणाले, “अशी घाईगडबड करायची नाही. अजिबात नाही. चार महिन्यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत विचार होईल तुमच्या ऑफरवर. तेंव्हा बघू. मग पुढच्या वर्षीच्या सँक्शनमध्ये बसलं तर. एक मिनीट हां जरा.. ” त्यांनी वाजणारा मोबाईल उचलला. “हां… श्रीपती, आला का गेस्ट हाऊसला जाऊन? दिले ना व्यवस्थित? काही प्रॉब्लेम नाही ना? बरं बरं.. रात्री नाही थांबत म्हणाले? मर्जी त्यांची. बाकी काही कुरकुर नाही ना?. ठीक. ठीक आहे, म्हणतो मी. ”
त्यांची नजर पुन्हा तरुणावर स्थिरावली. “हां! तर…. काही गडबड नाही आहे आपल्याला. तुम्हाला वाटल्यास साईटवर चक्कर मारून या. बघू पुढंमागं सहा महिन्यानी… ”
तरुण पूर्ण डेस्परेट. पावसात चष्मा पुसून झाला की दिसतं तसं स्वच्छ दिसायला लागलेलं. पण साला शेवटचा प्रयत्न करायला हवा. “पण चेअरमनसाहेब, त्यांनी उद्या रिपोर्ट करायला सांगितलंय. नाहीतर आपलंच उत्पादन थांबवू असं नाही का म्हणाले ते? मग… ”
आबा जागेवरून उठले. अत्यंत मृदू आणि वात्सल्यपूर्ण असा हात त्यांनी तरुणाच्या खांद्यावर ठेवला. “तुम्ही कुठं त्यांचं बोलणं मनावर घेता? आं? आपल्याच डोक्याला त्रास होतो. आम्ही आहोत ना. अहो, सरकारी माणूस आहे. बोलतो. त्याचं कामच आहे ते. जास्ती महाग माणूस असेल तर जास्त बोलतो. आपणही त्यानुसार घेतलंय सगळं सावरुन. तुम्ही गेला तरी ते उद्या नाहीत ऑफिसला. .. टूरवर जाणारेत की हो ते! ”
“पण सर… निदान त्या नदीतल्या टॉक्सिसिटीमुळं, डिझॉल्वड ऑक्सिजन.. ”
तरुणाला मध्येच हातानं थांबवताना क्षणभरच आबांचे डोळे दगडी झाले. “ते बघतो आम्ही. तुम्ही या गावात नाही ना राहात? तुमच्याकडं आहे की महापालिकेचं पाणी. शुद्ध. मग झालं तर. ग्रामस्थांची आम्हालाही आहेच की काळजी! आमच्या काळज्या आम्हाला करू द्या. वाहतंच पाणी. नवीनच म्हणायचं ते. कुठं चार दोन बुडबुडे निघाले, फेस निघाला, हे, ते, तर काय हो एवढं? असू द्या. निघा तुम्ही. ऑफर किती दिवसांसाठी आहे – व्हॅलिड हो? ”
“सहा… सहा महिने. ”
“”आं…. मग काय! एकदा सहा आठ महिन्यांनी तुमच्या व्हाईस प्रेसिडेंटना फोन टाकायला सांगा. काय कमीजास्त असेल ते बोलून घेऊ. राम राम. ”
सदरहू तरुण विचारप्रवृत्त, अध्यात्मिक आणि शांत होऊन बाहेर आला. स्टँडर्ड झाडं डुलत वगैरे होती. वातावरण प्रसन्न. हवा छान होती आणि मधूनच त्या हवेला छेद देणारा गोड औद्योगिक वासही येत होता. नदीकडून येणारा, विकासयुक्त वास. मनात गुप्त स्वगत. पुन्हा. ‘काय करावं? काय करावं आता? ‘सिंहासन’ मधल्या दिगूसारखं मोठमोठ्यांदा हसावं? पण त्याला निदान एक हात पसरणारा तरी समोर आला होता. आपल्यासमोर तोही नाही. मग काय करावं? याच सीन मध्ये नसिरुद्दीन, अमिताभ, नाना कसे वागले असते? ‘
विचार करता करता तरुण चालत राहिला̱. घंटांच्या किणकिणण्यासारखे लांबवर कुठूनतरी लहान मुलांचं मतिमंदत्व, भाजीपाला पिकवायला अयोग्य जमीन, मिनामाटा सिंड्रोम -असे शब्द वाऱ्याबरोबर जाणवले. पण ते कुठे ऐकले ते मात्र आठवेना.
‘इतक्या सुसंस्कृत वाटलेल्या, बर्वे, लखीना यांच्या परंपरेची आठवण होणाऱ्या त्या प्रदूषणाच्या साहेबांना पर्यावरणाचं हे ‘असं’ महत्त्व कधी कळालं असेल? ट्रान्स्फर मागून घेताना? मग आपल्यालाच ते ‘तसं’ का नाही कळालं? आणि ते..̱ग्रामस्थ… कुठायत ग्रामस्थ? आणि शहरातले सगळे प्रेमी? प्राणीप्रेमी? पक्षीप्रेमी? ते कुठायत? का फक्त रविवारी येतात ते इकडे ‘आऊटस्कर्टस’ वर?
चालता चालता तरुण अचानक थांबला. संपूर्ण टोटलच त्याला व्यवस्थित लागली. झेनमध्ये यालाच साक्षात्कार म्हणतात…. सातोरी… समोरच एक लहान मुलांसाठी साबणाचे बुडबुडे काढायचं खेळणं विकणारा चालला होता. नदीत टॉक्सिक वेस्टचे बुडबुडे होते. ते काढणारे, कमवता कमवता पर्यावरण, निसर्ग असले शाब्दिक बुडबुडे काढत होते. आपण निदान हे साबणाचे बुडबुडे काढावेत. हीच ती आसपासच्या परिस्थितीशी आत्मसाक्षात्कारी एकतानता! झेन सातोरी!
विकत घेतलेल्या खेळण्यातून अत्यंत अचूक, काळजीपूर्वक तो रंगीबेरंगी बुडबुडे काढत राहिला. त्याला हसणाऱ्या शेंबड्या पोरांकडे लक्ष न देता. कितीतरी वेळ…
Leave a Reply