उद्यापासून सुरवात

June 14, 2009 at 12:48 am (Uncategorized)

घनदाट जंगलाचे दोन भाग काहीसे अलग करणारी वस्ती जीपच्या प्रखर दिव्यांतून अचानक दिसायला लागली. सरोदेनं मग वेग थोडा कमी केला आणि शेजारी बसलेल्या पेठेसाहेबांकडं पाहिलं. त्याच्या अपेक्षेनुसार पेठेसाहेब म्हणाले, “सिगारेट ओढूया का एकेक?… पुढे जंगलात नको उगीच. ”

हेही नेहमीचंच होतं. कितीही शौकीन असले तरे जंगलाच्या कोअर एरियात पेठेसाहेब कधीच सिगारेट ओढायचे नाहीत. निम्मी अधिक सिगारेट होईपर्यंत पेठेसाहेब काहीच बोलले नाहीत. पाड्यावर झालेल्या आदिवासींच्या मीटिंगचा विषय दोघांच्याही डोक्यात होता. मीटिंग चाललीही बराच वेळ; पण नाही तर हा विषय आदिवासींना कळला नसता. ते होणं आवश्यक होतं. अचानक पेठ्यांनी प्रश्न केला, “काय अंदाज, सरोदे? तीन्ही-चारी पाडे मिळून किती पोरं होतील तयार? ”

“दहा -बारा तरी मिळतील. त्यातली पुन्हा टिकतील किती, ते महत्त्वाचं. कारण प्रेशर्स तर येतीलच. नक्षलवाद्यांना दुसऱ्या कुणाशी ती बोलली, की आवडत नाही. पुन्हा हुकूमचंदसारख्या स्मगलरशी क्लॅश, म्हणजे तोही आडवं घालणारच. ”
पेठे हसले. “हीच तर त्यांची मनं तयार करता-करता झाले ना वर्षाभरात केस पांढरे…! पण पटल्यासारखी वाटतात. सिद्रामला पकडून ठेव. बाकी पोरांवर त्याचा होल्ड चांगला आहे. आतापर्यंत नक्षलवाद्यांनी पळवला नाही, हीच मेहेरबानी आहे. चल सुटू… पोरांना कधी, उद्या सकाळी बोलावलंय ना? ”

“हां सर… मी करतो व्यवस्था सगळी. ”

साहेबांना बंगल्यावर सोडून सरोदे क्वार्टर्सवर आला. आत जबरदस्त उकडत होतं; पण बाहेर मस्त झुळूक होती. बाजेवरच तो आडवा झाला, तेंव्हा चांदण्यांनी भरलेलं भरगच्च आकाश त्याला दिसलं. इंद्रावतीच्या रानव्याचा, शुद्ध हवेचा वास त्यानं खोल छातीत भरून घेतला. 

‘साहेबांची स्कीम तशी तगडी आहे’ सरोदेच्या मनातल्या विचाराबरोबरच गेल्या वर्षातल्या अनेक घटना त्याच्यासमोर तरळून गेल्या. इंद्रावतीचं घनदाट जंगल पट्टेरी वाघांसाठी राखीव झालं. तिथल्या स्थानिक आदिवासींचं पुनर्वसन होतं… पण त्यांना रानाबाहेर न घालवता ते करायचं होतं. त्याच वेळी ही शक्कल पेठेसाहेबांना सुचली. दूध, मध, डिंक, नियंत्रित मासेमारी हे नेहमीचे उद्योग तर होतेच; पण तसं पाहिलं तर हे आदिवासीच इथले खरे मालक. इंद्रावतीत चालणाऱ्या भुरट्या चोऱ्या, पोचिंग याच्याविरुद्ध त्यांनाच हाताशी का नाही धरायचं? वाघांच्या अवयवांचे सौदे करून लाखोंमध्ये कमावणाऱ्या वन्यजीव माफियाचं जाळं इंद्रावतीत पसरत चाललं होतं. भारतीय वाघ संपत चालला होत. करायला तर लागणारच होता काही ना काही उपाय.
विचाराविचारांमध्ये झोप डोळ्यांवर अलगद उतरली. सरोदेला कळलंही नाही.

——————————————————————————————————–

योजनेच्या सरकारी मंजुरीची कागदपत्रं चाळून पेठेसाहेब बाहेर आले. पोरं जमली होतीच. सरोदेनं अंथरलेल्या सतरंजीवर अवघडून बसली होती. साहेब थेट त्यांच्यासमोर येऊन बसले. “उद्यापासून कामाला सुरवात करायची. समजून घ्या नीट… काही अडचण, खोळंबा असेल तर आत्ताच बोलून घ्या.”

“जंगलाचे तीन वाटे आपण केलेत. एकेका वाट्यात तीन चार जण कामाला. साग, कळकाची गर्दी आहे, झरा आहे तो वाटा पहिला. आंधारी पाड्यातली मुलं तिथं राखण करतील. दुसरा वाटा तळ्याच्या आसपास. चोरटी मासेमारी तुम्ही थांबवायची. तिसरा वाटा- तुम्हाला जास्त जिम्मेदारी, जास्त धोका आहे. तुमचा रस्ता रोज बदलेल…. ते मी त्या त्या दिवशी सांगीन. हुश्शार राहून जंगलातल्या खाणाखुणा तपासत, वाघांसाठी लावलेले पिंजरे, विजेच्या तारा, विष घातलेली गुरांची कलेवरं हे सगळं हुडकत, फिरत रहायचं. कुणी कातडीचोर, नख्या काढणारे दिसले, हुकूमचंदची माणसं दिसली तर धरायचं. एक जण इकडं वर्दी द्यायला येईल. उरलेल्यांनी त्याला धरून ठेवायच. ध्यानात घ्या, नुसतं धरून ठेवायचं. मारामारी नको. पुढे मग आम्ही बघून घेऊ. ”

साहेबांनी क्षणभर थांबून अंदाज घेतला. पोरांच्या डोळ्यांत चांगली चमक दिसत होती.

सरोदे बोलू लागला, “तिसऱ्या वाट्यात फेंगड्या, तू आणि सिद्राम. फेंगड्या जंगलाची पत्ती न पती ओळखतो. चोरट्यांचा वावरही तुला, सिद्रामला ओळखता येईल. काम जोखमीचं आहे. हुकूमचंदच्या माणसांकडं हत्यार पण असेल आणि तुमच्या हातात काठ्या. पण टाईट राहा. धीर गमावू नका. कुणी दिसलं की वर्दी द्यायला लगेच सुटा.”

  पेठे आणखी थोडे पुढे सरकले. “फिकीर करू नका. आम्ही शहरात पोलिसांशी बोलून आलोय. एकदा पकडले गेले की दहा – वीस वर्षं आतमध्ये जातील साले. तुम्हाला काय धोका नाही. ”

सरोदे आत जाऊन प्रत्येकाचे गणवेष घेऊन आला. “या कामाचा महिन्याचा मेहनताना तर आहेच, पण पकडलेल्या प्रत्येक वस्तूमागं बक्षीस पण आहे. बघा रे, कापडं मापात बसतात का… ”

गणवेष, काठी, शिट्टी… आदिवासी पोरांना काही खरंच वाटत नव्हतं. कुठल्याही सरकारी खात्याचा ‘साहेब’ असं समजावून सांगतानाही त्यानी कधी पाहिला नव्हता. पाहिली होती ती फक्त अरेरावीच…. नेपानगरवाल्यांची काय, तेंदूच्या ठेकेदारांची काय आणि सरकारी खात्याची काय!
बैठक संपली होती.

झाडावर प्रचंड वेळ बसल्यामुळं फेंगड्या कंटाळला होता. इतर वेळी त्याचे तासनतास रानात कसेही जात; पण सतत कशाची तरी वाट पाहण्याचा त्याला आता कंटाळा आला होता; पण इलाज नव्हता. खबर पक्की होती.

पाड्यावरचं एक छोटं, पण चलाख, बेरकी पोरगं सकाळीच त्याच्या कानाशी लागलं होतं. “हुकूमशेटची लोक येतव हां आजला… चिलम्याची गाठ घेताव” ते कुजबुजलं होतं. फेंगड्याच्या तोंडातली बिडी गपकन खाली पडली. साहेबाला वर्दी देऊन टेहळायला जायला लागणार. हुकूमचे लोक जबलपूरपासून येणार म्हणजे दुपारनंतरच. चिलम्याला गाठतील.

आख्ख्या पाड्यात फक्त चिलम्याच गांजेकस होता. थोड्याशा गांजा-चरससाठी तो हुकूमच्या माणसांचं काहीही ऐकायचा. वाघाचा माग देईल, घेईल, त्यांनी वाघासाठी आणलेलं विष गाईगुरांच्या कलेवरात भरून मोक्याच्या जागी ठेवील. एवढं मोठं अंबाईचं वाहन असणारा रुबाबदार वाघ विष खाऊन आडवा, निस्तेज झाला, की त्याच्या नख्या, मिशा उपटील. कातडं सोलणं म्हणजे रात्रभराचं काम. तेही हा गडी चार तासात उरकील. एवढ्याशा गांजासाठी.

फेंगड्याचा विचार थांबवणारी आणि कंटाळा पूर्ण घालवणारी गोष्ट त्याला अचानकच दिसली. थेट एका येणाऱ्या जीपवर त्याचे डोळे स्थिरावले. एका मोकळ्या भागात ती जीप थांबली. तीन जण होते. एक जण खाली उतरून, पेठेसाहेबासारखी शहरी सफेत कागदवाली बिडी पीत होता. फेंगड्या आवाज न करता खाली उतरला… आणि चिलम्या आलाच. आणि नुसता नाही आला; त्याच्याबरोबरच्या खोळीत काही तरी भरलं होतं; आणि हातात तर गुंडाळी केलेलं पटेरी वाघाचं कातडंच. मागल्यामागे फेंगड्या अलगद, सुसाट पळाला. आता सरोदेसाहेब आणि खात्याची जीप.

———————————————————————————————————-

संपूर्ण कानभर माचिसची काडी घालून अर्धवट मिटल्या डोळ्यांनी हुकूमचंद पंटर्सची हकीकत ऐकत होता. काहीशा अस्फुट हसऱ्या नेहमीच्या चेहऱ्यानं तो ऐकत होता; पण आज त्यात उमटलेला जहरी विखार समजणं त्याच्या पंटर्सच्या कुवतीबाहेरचं होतं. ज‍बलपूर मंडी मार्केटमधल्या एका दुर्लक्षित बिल्डिंगमध्ये वाचलेले पंटर्स हकीकत सांगताना अवघडून कोपऱ्यात उभे होते.
झाली गोष्ट हुकूमचंदला सटकवायला पुरेशी होती. वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी हा त्याचा तीन पिढ्यांचा धंदा होता. कस्टम्सपासून पोलिसांपर्यंत लोक बांधले होते. माल जप्त तर सोडाच, एकाही फॉरेस्टवाल्याची, पोलिसाची साधी केस लावायची शामत झाली नव्हती. आणि आज ही स्टोरी. त्याची नजर एका पंटरवर स्थिर झाली.

“आपली जागा त्यांना कुठून कळाली? ”

“शेट, आत जाताना तर आपलाच फॉरेस्ट गार्ड होता. काय बोलला नाय. मग धोका नाय वाटला. आतनंच कुणीतरी पाहिलं. कारण तो सरोदे, त्याचा मोठा साहेब, सगळे मागावर आले. ”

दुसऱ्या पंटरनंही री ओढली. “इतलाच नाय शेट, पाड्यावरची तीन पोरंपण त्यांच्या बाजूनी मदी पडली. मग आमी कमी पडलो. गाडीमुळं कसेतरी सुटलो. ”

“पाड्यावरची पोरं तिकडून मध्ये पडली? ”

“होय शेट. वर त्यानला खाकी कापडं दिलीयत…. शिट्टी, काठी दिलीय. ”

अच्छा. म्हणजे मोठी गेम होती. हाताच्या एका उडत्या इषाऱ्यानं त्याने सगळे पंटर बाहेर हाकलले. तंबाखूचा एक विस्तृत आणि सविस्तर बार भरला. पहिला हिशेब अर्थातच झालेल्या नुकसानीचा. दहा-बारा लाखांचा माल तर गेलाच. दोन कसलेले पंटर गजाआड. चिलम्यासारखा पाड्यावरचा कॉंटॅक्टपण अंदर, तेही कमीत कमी बारा – पंधरा वर्षं. अटकेस कारण मादक पदार्थ जवळ बाळगणं व विकणं. आणि वर पाड्यावरची पोरं फॉरेस्टवाल्यांबरोबर? माजरा क्या है? हुकूमसाठी पिंजरे लावणारी, ऐन पावसाळ्यातही ‘माला’ ची ये-जा न थांबवणारी पोरं फॉरेस्टवाल्यांनी पटवली?

आणि मुख्य. पाड्यावरचंही निस्तरलं असतं. पण हेडक्वार्टर्स? त्यांना काय उत्तर देणार? माझी, हुकूमचंदची, सिस्टीम फेल झाली? सेकंदभर नखशिखांत भीतीची एक लाट हुकूमचंदाचा कणा हलवून गेली…

हेडक्वार्टर्समध्ये सर्वार्थानं त्याचे बाप बसले होते. सीमावर्ती भागात धुमाकूळ घालण्यासाठी आणलेले प्रशिक्षित, भाडोत्री अतिरेकी… अस्सल अफगाणी क्रौर्य त्यांच्या नसानसांत भिनलेलं होतं. आनंद किंवा दुःख काहीही झालं तरी एके-५६ वगैरेतून हवेत गोळ्या उडवून ओरडत भावना व्यक्त करणारे ते सुंदर, बिनडोक, रेमेडोके होते.

डीलिंग व्यवस्थित केलं, तर अझीझ दोस्त. सगळं नीट होऊन वाघाची हाडं, कातडी, नखं जर नीट त्यांना पोचतं झालं की लगेच कॅश आणि नारकोटिक्स हुकूमला मिळायचीच. वर एक -दोन रात्री जोरात जशन…. पण जर तारीख देऊन पाळली गेली नाही तर फरक फक्त एके-५६ का ४७ इतकाच. त्याचं कारण होतं. सगळीकडून नाड्या आवळल्यामुळे वाघांचे ते अवयव म्हणजे अतिरेक्यांची ‘कॅश’च होती. त्यांच्याकडून ते तिबेट बॉर्डरमार्गे चिनी औषध कंपन्यांत जात. विशेषतः हाडं. नखं, मिशा लंडन, पॅरीसच्या फॅशनच्या दुकानात. त्यातनं मिळालेल्या पैशातून मग शस्त्रखरेदी, भारतातलं नेटवर्क वाढवणं हे सगळं.

ही पूर्ण साखळी झरझर हुकूमचंदच्या डोळ्यांसमोरून गेली. आज किती वर्षांनी आपण त्यातला किती कमकुवत दुवा आहोत, हे जाणवून त्याला हतबल वाटत होतं; पण त्यानं शब्द पाळला नव्हता; त्यामुळे निदान झाली गोष्ट कळवणं भाग होतं. एक लांबलचक जबलपुरी शिवी हासडून हुकूमचंदनं तितकाच लांबलचक मोबाईल नंबर फिरवला…. रॉक्सॉल बॉर्डर!

जाहीर रीतीनं चेहऱ्यावर समाधान दिसणं ही गोष्ट पेठ्यांच्या बाबतीत तशी दुर्मिळ होती; पण तसा एक दिवस आज होता. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं साक्षात प्रोजेक्ट टायगरचे महासंचालक इंद्रावतीत आले होते. फेंगड्या, सिद्राम आणि कंपनीनं गेल्या चार-सहा महिन्यांत वाचवलेल्या व्याघ्र अवयवांचा फॉरेस्ट पंचनामा त्यांनी आपल्या सहीनिशी केला होता. पाच वेळा वाघांसाठी लावलेले पिंजरे निकामी करणे, चार वेळा विष भरलेली गुरांची कलेवरं पकडणे या सगळ्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं होतंच, पण जप्त केलेली साठ किलो वाघाची हाडं, नखं, मिशा, चार कातडी हेही जातीनं डोळ्याखालून घातलं होतं.

छोटंसं भाषणही त्यांनी केलं होतं. दर वर्षी कमीत कमी चाळीस हजार कोटी रुपयांची निसर्गसंपत्ती भारतीय वाघ राहतो त्या परिसरातून माणूस मिळवतो. निदान ती मिळत राहावी म्हणून का होईना, वाघाला, त्याच्या परिसराला जपायला हवं, हे त्यांनी सोप्या शब्दांत सांगितलं होतं. आंतरराष्ट्रीय माफिया आणि पोचर्सनी वन्यजीवांचा चोरटा व्यापार सहा दशलक्ष डॉलर्सवर पोचवला आहे, ही माहिती तर खुद्द पेठेसाहेबांनाही नवीन होती.

त्यांना काळजी एकच होती. स्मगलर्स अजूनही थंड कसे काय? काहीच रिटॅलिएशन कसं नाही?

——————————————————————————————- 

सकाळी उगवतीलाच सिद्राम टेहळणीला निघाला होता. पहाटे पाऊस बरसून गेला होता. साल, कळक, अर्जुन या झाडांच्या तळाशी प्राण्यांचे ताजे ठसे होते. बुंध्यावर घासलेल्या वाघा-अस्वलांच्या नखांच्या खुणा होत्या. माकडांनी, वानरांनी गोंधळ घालून ही एवढी फळं पाडून ठेवली होती. रानाला जाग येत होती. सिद्राम चालत होता.

अलीकडे या सगळ्याकडं बघण्याची त्याची नजरच बदलली होती. या सगळ्याचा आपणही एक भाग आहोत, त्याची निगराणी करतो आहोत, याचं त्याला राहून राहून अप्रूप वाटायचं. असंही वाटायचं की आपण हेच करणार. करायलाच हवी ही राखण. सडक ओलांडून तो रानात घुसू पाहत होता. इरादा हा, की वाघांसाठी लावलेला एखादा पिंजरा मिळतोय का, ते बघावं. अचानक क्षणभरात त्याच्या पाठीतून कापत काही तरी जाऊन अंगात जाळ झाला. पाठोपाठ आणखी एक असह्य वेदना मानेजवळ. आपला गणवेश रक्तानं भिजतोय, हे कळेपर्यंत तो कोसळला होता. सगळा जन्म रानव्यात काढलेल्या त्या तरण्याबांड पोरानं आपला शेवट ओळखला, मरण ओळखलं. आभाळाच्या आकांतानं त्यानं एकदा त्याचं लाडकं रान बघून घेतलं. धूसर, अस्पष्ट अशी एक पाड्याची, घराची आठवण आणि मग डोळ्यापुढं अंधार. सगळी तगमग एकदाची शांत करणारा सर्वंकश, सर्वव्यापी, निराकार अंधार. सायलेन्सर लावलेल्या कॅलेश्निकॉव्हनं आपलं काम चोख बजावलं होतं.

——————————————————————————————– 

काळ, पोचर्सनी सिद्रामला संपवला. त्यानंतर साधारण सव्वा महिन्यानंतर अगम्य, नॉर्डिक भाषेत आपल्या संस्थेचं नाव मिरवणारी एक परदेशी सलोन कार पेठ्यांच्या ऑफिससमोर येऊन थांबली. संपूर्ण यशस्वी आणि आयुष्यातला बराच भाग नॉर्डिक देशांमधल्या एवंगुणविशिष्ट ग्रँटांवर पोसली गेलेली एक समाजसेविका त्यातून खाली उतरली. जुजबी बोलून, एक अर्ज पेठ्यांच्या टेबलावर ठेवून खास ग्रँटाडं स्मितहास्य मिरवत ती निघूनही गेली. ती दिसेनाशी झाली त्या क्षणी फडफडणारा तो अर्ज पेठ्यांनी चुरगाळून खाली फेकला. त्वेषानं फेकला.

“किती दिवस झाले रे सरोदे, सिद्रामला संपवून? आज येताहेत हे…. आज! त्याच्या घरच्यांचं काय झालं… नाही आले कुणी विचारायला. निधी आपणच जमवला. एक वेळ या ह्यूमन राईटवाल्यांचं सोड. एरवी शहरांतून गाड्या भरभरून माणसं आणून जंगलात ट्रेक, ट्रेल, नेचर कँप काढणाऱ्या संस्था? त्या कुठेयत? पाणवठ्यावर बॅटऱ्या मारून रात्री लोकांना प्राणी दाखवणारे, त्यांच्या पाण्याच्या जागा डिस्टर्ब करणारे हे लोक… कँपफायर करायचे लेकाचे इथे. महिन्याभरात कोण दिसायला तयार नाही. आणि हे राईटसवाले अर्ज देताहेत… आदिम समाजाचे बळी घेणाऱ्या या योजना बंद करा म्हणून? ”

क्षोभ अनावर होऊन त्यांनी हातातली सिगारेटही भिरकावली.

“सरोदे, अरे हेच तर पाहिजे व्हायला. पोचर्सना, स्मगलर्सना. लोकल ट्रायबल्सचं मोराल खच्ची. बसली ना आपल्या गटातली चार पोरं घाबरून घरात! हीच गेम असते. मानस सॅंक्चुअरीत उल्फाच्या अतिरेक्यांनी हेच केलं… भीतीची पैदास! ”

त्यांनी दमून आवंढा गिळला. श्वासही खोल घेतला. “सरोदे, योजना बंद करायची नाही. योजना बंद होणार नाही. परीटघडीचे परिसंवाद नाहीयेत इथं! ‘स्थानिक जनतेचा वनव्यवस्थापनात सहभाग’ वगैरे! आपण करून दाखवतोय ते! ”

अचानक चाहूल लागल्यामुळं त्यांनी दारात पाहिलं. फेंगड्या चार नवीनच पोरं घेऊन उभा होता.

“टेहळायच्या कामाव येताव म्हनाले. म्हनलं घ्या सायबाशी बोलून. मी कामाव जातो, सायेब. ” काठी उचलून फेंगड्या गेलासुद्धा.
पेठे साहेबांनी सरोदेकडं पाहिलं. अत्यंत थकलेल्या, पण विलक्षण समाधानी आवाजात ते म्हणाले, “घे बोलून त्यांच्याशी. युनिफॉर्मचे साईझेस बघ. उद्यापासून सुरवात. “

1 Comment

  1. Facebook English Wikipedia Anti-SOPA Blackout and Explained Tuzelberg said,

    ् ् ी ् ी ी ी ी ी .

Leave a comment