यिन, यँग अन साताळकर
एकंदरीतच त्या दिवशी ग्राफिक डिझायनर राजू देशपांडे प्रचंड कंटाळला होता. सरळ स्टुडिओ बंद करुन गावाबाहेर एक निर्हेतुक, शून्यमनस्क चक्कर मारण्याच्या विचारात तो होता. दिवसभरात एकहीचमकदार, लक्षात रहावी अशी घटना घडली नव्हती. त्यामुळे आलेला कंटाळा.
असं खरं फार वेळा व्हायचं नाही. रंग, रेषा, छायाचित्रण, अक्षरकला, कागदांचे वेगवेगळे प्रकार, संगणक या सगळ्यातून उमलत जाणारं त्याचं काम, त्याला ताजंतवानं ठेवायचं. पण अशी काही निर्मिती पण त्यानं त्या दिवशी केली नव्हती.पण कुठला विचार पक्का होण्याच्या आतच, त्याला स्टुडिओत कुणी आल्याची जाणीव झाली.
कसलीशी गुंडाळी प्लॅस्टिकच्या पिशवीत घेऊन दारात एक लहान चणीचे प्रौढ गृहस्थ उभे दिसले. तद्दन पारंपारिक जाडजूड वहाणा, चष्मा, साधीशी पँट-शर्ट.
“राजू देशपांडे – झेन आर्ट स्टुडिओ?” काहीशा संकोचानंच त्या गृहस्थांनी विचारलं.
राजूनं उठून हात मिळवला.”मीच. बसा. काय काम काढलं?”
“हे… हा एक नकाशा आहे… जुना. म्हणजे खरंतर ऐतिहासिक, दुर्मिळ प्रकारातला आहे. स्कॅनर असेल ना आपल्या इथे?”
“आहे ना. काय नाव साहेब आपलं?” राजूनं त्यांनी दिलेली गुंडाळी उलगडली.
“अरे हो.. मी साताळकर. सातारकर नाही हं.. सा-ता-ळ-क-र. सोळाव्या आणि सतराव्या शतकातल्या डच आणि फ्रेंच वसाहती आणि आपले मराठेशाहीचे त्यांच्याबरोबर संबंध, अशा विषयावर मी काही अभ्यास, संशोधन केलं आहे. त्याच संदर्भातला हा एक अस्सल नकाशा आहे. भारतातल्या फ्रेंच कॉलनीज् आणि तिथली तत्कालिन स्थानं निश्चिती करणारा.”
पुन्हा एकदा त्यांनी तो राजूकडून घेऊन बघितला. “मूळ तर मला परत द्यावा लागणार आहे. पण स्कॅन करून एक प्रिंट.. आणि जर तुमच्या या यंत्रात त्याची एखादी प्रत ‘ई-जपून’ ठेवता आली तर…”
राजूनं मान हलवली. “एखादा दिवस ठेवता येईल का सर? म्हणजे आमच्या त्या राईट पिक्सेल साईजला वगैरे करून मी तुम्हांला प्रिंट देईन, आणि कोरल मधे घेऊन एक सीडी पण.”
“किती पैसे होतील, या सगळ्याचे ? उद्या चार पर्यंत होईल ना? तुम्हाला मी काही रक्कम आगाऊ देऊन ठेवू का? आणि तुम्ही हा नकाशा व्यवस्थित जपाल, ना?” त्यांचे तेच काही क्षण थबकले. ” मी फार प्रश्न एका दमात विचारले का? अर्थात हाही प्रश्नच झाला
म्हणा.”
राजूला हसायला आलं. “ठीक आहे, सर, ऍडव्हान्स वगैरेची गरज नाही. आणि मॅपची ‘वर्थ’ मला कळलीय् – काही काळजी करू नका. चार वाजता नक्की तयार ठेवतो.”
अशी जरा वेगळी, चॅलेंजिंग आणि ज्ञानाबिनात भर टाकणारी कामं आली, की राजूला आपल्या धंद्याबद्दल जरा प्रेमच दाटून यायचं. मनासारखी पेंटिंग्ज करायला वेळ होत नाही, या बद्दलची त्याची खंत कमी व्हायची, हे एक असलं काम होतं. स्कॅनिंगच्या मिळणा-या अडीचशे-तीनशे रुपयांहून खूप पटीनं मूल्यवान.
दुस-या दिवशी सा-ता-ळ-क-र बरोबर चारला उगवतील, हा त्याचा अंदाज खरा ठरला. सकाळीच त्यानं त्यांचं बरंचसं काम पूर्ण केलं होतं.
“बसा सर….” राजूनं आणखी एक खुर्ची संगणकाजवळ ओढली. त्यावर पडलेला, कुठल्याशा बँकफोर्जर नटवरलालची कव्हर स्टोरी असलेला इंडिया टुडेचा अंक, त्यानं बाजूच्या टेबलवर टाकला आणि’साताळकर’ नाव दिलेला फोल्डर संगणकात उघडला.
“व्वा. बरंचसं झालंच आहे की. छान होतंय”. साताळकर. “हो सर.. पण मला एक दहा मिनिटं द्या. सगळ्या फॉरमॅट्ससाठी कंपॅटिबल फाईल्स करून तुम्हाला सीडी देतो.”
आणि तो एकाग्रपणं कामाला लागला. साताळकरांनी बाजूला पडलेला ‘इंडिया टुडे’वाचायला घेतल्याचं त्यानं पाहिलं.
काम पूर्ण होताहोताच साताळकरांच्या आवाजानं त्याची तंद्री मोडली.
“हे वाचलं का तुम्ही, या बँकांना गंडवणा-या चोराचं… कोण हा नटवरलाल?” साताळकर विचारत होते.
“साधारण चाळलं. काय त्याचं?” सीडी ड्राईव्हमध्ये घालतांना राजूनं विचारलं.
“अहो.. ह्याची फसवणुकीची सगळी तंत्रं… सगळीच जवळपास, आम्ही लोक आमच्या संशोधनात अस्सल नक्कल कागदपत्रं, दस्तावेज ओळखायला वापरतो. डिमांड ड्राफ्टवरची चिकटपट्टी हा बायकांच्या हेअरड्रायरनं सोडवतो. जुने पुराणे दस्तऐवज आम्हीही असेच सोडवतो. फोर्जड डिमांड ड्राफ्ट करण्यासाठी कागद अल्ट्राव्हायोलेट प्रकाशात बघून शाई कुठे किती मुरली आहे, हे तंत्र तर कित्येक शिक्के, कागद यांच्या अस्सलपणासाठी आम्ही वापरतो. कागद खरवडून मूळ रक्कम खोडली, की खरवडलेला कागद कळू नये, म्हणून विशिष्ट खळीचा वापर… कमाल आहे. आम्ही सगळी, सगळी तंत्रं- अशीच, फक्त भल्या उद्देशानं कागदपत्रांच्या पडताळणीत चिकार वापरतो. महाठक आहे हो, हा माणूस. कोटींत कमावले त्यानं हे सगळं वापरून आणि साताळकर हिंडतायत् जुन्या लँब्रेटावरून. असो. तर काय झालं आपल्या त्या नकाशाचं? झालाय का?”
तोवर राजू देशपांडेनं एक सीडी आणि एक प्रिंटही काढली होती. ती त्यानं साताळकरांकडे दिली.
“उत्तम … मला काही बघायला लागलं नाही. किती पैसे देऊ याचे?” साताळकर समाधानी दिसले.
” काय… दोनशे रुपये द्या, सर. आपली ओळख झाली, ह्याचा मला आनंद जास्त आहे.”
“हे घ्या…” साताळकरांच्या चेह-यावर मिस्किल भाव आला. “आणखी वृध्दिंगत करायची असेल -ओळख, तर मी चार गल्ल्या पलीकडेच राहतो. आज वाहन आणलं नाही. मला सोडाल का घरापर्यन्त? चहाबिहा पिऊ. सौभाग्यवतींचीही ओळख होईल.”
राजूनं मूळ नकाशा कुलपातून बाहेर काढतांनाच होकारार्थी मान हलवली.
घरी परतेपर्यंत त्याच्या डोक्यात साताळकरच होते. त्यांनी केलेलं ते बँक फोर्जर- इतिहास संशोधक हे विश्लेषण त्याला घट्ट मनात बसलं होतंच. पण त्याहूनही जास्त, त्यांच्या घरातील बाहेरची, बैठकीची खोली आणि साताळकरांची उमटलेली खंत, जणू अधोरेखित करणारी त्यांच्या टेबलवरची, राजूला खटकलेली एक गोष्ट.
अडीच तीन खोल्यांच्या त्यांच्या संसारात, बाहेरच्या खोलीत ब्राऊनपेपरची कव्हर्स घातलेली कैक पुस्तकं अपेक्षितच होती. चारातल्या दोन भिंती व्यापलेली. त्यांच्या मेजावर (टेबलावर नव्हे!) साग्रसंगीत दोन मस्त बोरु, शाईची दौत असा जामानिमा होता, तोही राजूला अपेक्षितच होता. त्याला एक सवय होती. प्रत्येक माणसाच्या बैठकीच्या खोलीत एक वस्तू अशी असते, जी बहुतेक दुसरीकडे कुठे न दिसणारी असते. राजू कुणाहीकडे गेला, तरी ती कळीची गोष्ट पहात, शोधत असायचा. त्यातून कदाचित काही वेळात्या माणसाचाही जरा अंदाज घेता यायचा. या ‘बोरू-दौत’ कॉम्बिनेशनला त्यानं त्या ‘एकमेवाद्वितीय’
वस्तूचा मान देऊनही टाकला होता.
पण यात खटकण्याजोगं काही नव्हतं. तो थोडासा आश्चर्यात पडला होता, ते त्या दौतीखालचीएक गोष्ट पाहून. ‘प्लेविन सुपर लोटो’ आणि ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ अशी प्रत्येकी दोन-दोन तिकीटं त्या दौतीखाली फडफडत होती, त्याचं त्याला आश्चर्य आणि वाईटही वाटलं होतं. कारण, झालेल्या बोलण्यातूनच साताळकरांची जी विद्वत्ता प्रकटत होती, त्याला ती तिकीटं छेद देत होती.
चहाबरोबर झालेल्या गप्पामंध्ये, साताळकरांनी राजूच्या ज्ञानात बरीच भर टाकली होती.
स्टुडिओतल्या त्यांच्या बोलण्याचा धागाच त्यांनी पुढं नेला होता. रंग, रेषा, भाषा, कागदाचे प्रकार या सगळ्याशी राजूची असलेली जवळीक ओळखून की काय, पण बनावट ऐतिहासिक पत्रं, कागद लोक कसेकसे बनवू शकतात, मग ते ओळखतांना संशोधकाला काय काय कसरती कराव्या लागतात हे सगळं सांगितलं होतं. अशा कागदपत्रांचं वस्तुनिष्ठ परीक्षण काय काय तंत्रं वापरून करतात, यावर त्यांनीच लिहीलेल्या इंग्लिश शोधनिबंधाची प्रतही त्यांनी उत्साहानं राजूला वाचायला दिली होती.. बळंच. संशोधनात बुडवून घेतल्यामुळं पैसे मिळवता आले नाहीत, ओढग्रस्त कायम राहिली ही खंतही मधून मधून बोलण्यात डोकावत होतीच. फ्रान्समधे किंवा युरोपात असा बनावटपणा, निदान चित्रांचा –
ओळखण्यासाठी प्रचंड मानधन मिळतं हे राजूकडून ऐकल्यावर तर त्यांनी निव्वळ कडवटपणं मान नकारार्थी हलवली होती.
बाईकवरुन परत येतांना राजू त्यांच्याबद्दलच विचार करत होता. असे एकांडे संशोधक, कलावंत यांची आपल्या समाजात होणारी उपेक्षा त्यानं इतर काही लोकांचीही पाहिली होती. काही लोक त्यातले अस्सल कलंदर बेअरिंगमधे असल्यामुळे त्यांना अशा गोष्टींची खंतच वाटत नाही, असेही त्यातले काही पण फार कमी, राजूच्या मनात आलं. बहुतांश लोक असेच कुढत राहून, कडवट बनत गेलेले. पण समाजाचा अस्सल, नॉनइंटरनेटी ज्ञानसंचय जपून ठेवलेले. सगळ्या जीवनसंघर्षात सुध्दा. साताळकर एरवी कितीही चिकित्सक, विश्लेषक असले, तर्कशास्त्राळ्य विचार करणारे असले तरी ‘लॉटरी लागणे’ हा
मोह टाळू शकत नव्हते, ते त्यांच्यातल्या या मानवी वैतागामुळंच असणार. त्यात नेमका त्यांना ती बँकफोर्जरची कव्हरस्टोरी वाचायला मिळाली. म्हणजे आध्यात्मिकरीत्या भयंकर उन्नत झाले असणार ते, राजूला वाटून गेलं.
पण स्टुडिओत पोहोचल्यावर एका अभियांत्रिकी उद्योगसमूहाची ऑटोकॅडमधली ड्रॉइंग्ज – प्रोसेसिंगसाठी त्याची वाट पहात होती. त्यामुळं साताळकरांच्या शोधनिबंधाची प्रत बाजूच्या कपाटात फेकून, ग्राफिकडिझायनर राजू देशपांडे कामाला लागला होता. साताळकरांना मेंदूच्या द्वितीय श्रेणी स्मरणशक्तीच्या अगम्य कुठल्याश्या कप्प्यात टाकून. रोजच्या जगण्याचं उर्ध्वपातन होऊन, एक चांगली ओळख दिवसाभरातझाल्याचं समाधान मात्र त्याला निश्चितच होतं.
स्वतःची भली मोठी, पण जुन्यातली मर्सिडीज काढून चारुहास पेडणेकर त्या दिवशी जर मुंबईहून राजूला भेटायला आला नसता, तर कदाचित साताळकर हे नाव राजूच्या मेंदूच्या त्याच अगम्य कप्प्यात राहिलं असतं. पण तसं व्हायचं नव्हतं.
अचानक थेट स्टुडिओतच पेडणेकर दाखल झाला, याचं राजूला आश्चर्य वाटलं.
“पेडण्या – सो सड्न ऍन् अपीअरन्स ? फोन नाही, काही नाही … ये, ये.”
“पुणेऱ्या, फोन न करता येऊ नये का आम्ही ? नाय केला फोन. कामात जाम लटकलेलो रे. मूड आला, म्हटलं चला.. पुण्याला जाऊ. आर्टिस् लोक भेटतात का बघू.” पेडणेकरनं राजूच्या पाठीत एक प्रेमळ गुद्दा मारत म्हटलं. एक तर ‘लटकलेलो..’ वगैरे क्रियापदं अर्धी सोडण्याची मुंबईची बोलण्याची पद्धत, राजू अस्सल पुणेरी असल्यामुळं राजूला आवडायची नाही. त्यात सहा इंचाचा पर्सनल झोन ओलांडून गुद्दा वगैरे इतर कोणी मारला असता, तर राजू चांगलाच आक्रसला असता. पण चारु पेडणेकर या मित्राला सगळं माफ होतं. कारण तो साक्षात चारुहास पेडणेकर होता.
विचित्र, जुन्या, पण किंमती वस्तू खरेदी करणं हा खानदानी शौक पेडणेकरनं चांगला फायदेशीर रीतीनं व्यवसायात बदलला होता. खास मुंबईला मोठ्ठया कॅनव्हासवर मिळालेली संधी पुरेपूर वापरण्याचं उद्योजकी भान. त्यामुळे चारुचं कुलाब्यात ‘ ऍण्टिक गॅलेरिया’ हे दुकान कम् कलादालन जोरात चाललं होतं. अगदी सगळ्या बोहरी-पारशी ऍण्टिक डिलर्सच्या नाकावर टिच्चून. अनेक बाहेरदेशीचे आर्ट डीलर्स, ऑक्शनीयर्स, क्रिस्तीज्, सॉथ्बीज् सारखे मोठे लोक अशी मंडळी पेडणेकरच्या नित्य संपर्कात असायची.
एकूण त्याची ‘छपाई’ जोरात चालली होती. पण राजूला ‘पेडण्या’ आवडायचा ते या सगळ्यामुळं नाही.चारुहासची स्वतःची अभिरुची, सौंदर्यदृष्टी पण खरंच चांगली होती. राजूनंच फ्रेम करून, एन्लार्ज करून भेट दिलेलं लक्ष्मणचं ‘अँटिकच्या दुकानात जाऊन “व्हॉट्स न्यू” विचारणारं गिऱ्हाईक’ हे कार्टूनही स्वतःच्याच दुकानात लावण्याइतपत तरलही होता तो. मागे त्याची वेबसाईट डिझाईन करुन देतादेता, ते एकमेकांचे चांगले दोस्त बनले होते.
“पेडण्या, नाटकं नको करु. तू तिकडचं सगळं सोडून आला. ते काही मला भेटायला अन बाकरवडय़ा न्यायला नक्कीच नसणार. काम बोल. त्यात माझी काय मदत होणार असली, तर बघतो. एल्स, थोडावेळ थांब. एवढं डिझाईन पूर्ण करतो – मग कॉफी मारायला जाऊ.”
“टेक युअर टाईम, मॅन. मी एक सिगरेट ओढतो तोवर. कॅरी ऑन…”
कॉफी पितांना पेडणेकरनं सांगितलेला प्रकार चांगलाच गंभीर होता. पण राजूला तो इंटरेस्टींग पण वाटला.
“छत्रपती राजारामाचं एक अस्सल करारपत्र माझ्या हाती लागलंय”. पेडणेकर सांगत होता.
“ठाण्याची चिटणीस म्हणून फॅमिली आहे.. रुटस् पाँडिचेरीत असणारी. त्यांनी मला ऍसेस् करायला दिलंय, त्यांच्या अडगळीत पडलेलं. आयला राजू, आपण मराठय़ांनी पाँडिचेरी मस्त विकली होती रे या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला ! त्याचंच हे करारपत्र आहे. अमुक हजार पगोडाज् का काहीतरी करन्सी कॅशमधे घेऊन पाँडिचेरीचे सगळे हक्क फ्रेंच कॉलोनयाझर्सना विकणारं. त्याच्यावर राजारामाची मुद्रा… सील आहे आणि प्रल्हाद निराजीनं ते बनवलंय, असं एकूण वाटतंय. कोण रे हा निराजी?”
लक्ष देऊन ऐकणा-या राजूनं खेदानं मान हलवली. “मुंबट लेकाचे… तुम्हाला ना, ऍड गुरु प्रल्हाद कक्कर माहिती असेल… पण प्रल्हाद निराजी नाही ! अरे मोठय़ा राजांपासून पार अखेरपर्यंत स्वराज्य संभाळणारा फार हिकमती मुत्सद्दी होता तो. म्हणजे मला पण जास्त माहिती नाही, पण हे इतकं नक्कीच.”
“जाऊ दे रे राजू… तर मी हे विकत घेणार का, म्हणून फ्रान्समधली एक ऍण्टिक डीलिंग फर्म, फ्रेंच गव्हर्मेंटची अर्कायव्हल रेकॉर्डस् सर्व्हिस आणि बर्नार्ड सुलेंन् नावाचा प्रायव्हेट संग्राहक – अशा सगळ्यांना विचारलं. सगळ्यांनाच ते हवंय. यू नो, व्हॉट प्राईस सुलेन हॅज ऑफर्ड?.. पंचाहत्तर हजार ते एक लाख युरोज्. पन्नास लाखापर्यंत रुपये झाले ना बाप ! फक्त ते म्हणतोय की त्याचा अस्सलपणा तपासून, समअथॉरिटी हॅज टू व्हेरीफाय, सर्टिफाय अँड व्हॅलिडेट, की हा अस्सल दस्तऐवजच आहे. फेअर इनफ्!”
त्यानं कॉफीचा एक मोठा घोट घेतला. राजूनं सिगरेट पेटवली.
“पण मी … मी काय करणार पेडण्या यात ?”
” जास्त काव आणू नको हां, मला. अशी ऍथॉरिटी, असा एक्स्पर्ट मिळाला तर पुण्यातच! हे मी सांगू का तुला ? असल्या संस्था, असे लोक इथेच मिळणार लेका.”
एकंदरच सगळं भरताड पचवायला राजूला दोन मोठ्ठे झुरके ओढावे लागले. मग पेडणेकरला नक्की काय पाहिजे, याचा त्याला जरा अंदाज आला. कोण असेल, असं तज्ञ? आपल्या इथे ?
शहरात वारंवार उल्लेख होणारी, माध्यमांमधे ‘चमकून’ असणारी काही लोकं ही त्याला आठवली. पण ते ज्ञानमार्गी इतिहासवाले नव्हते. कुठल्यातरी मताच्या, विचारसरणीच्या किंवा चक्क स्वतःच्या जातीच्या समर्थनार्थ इतिहास वाकवणारे लोक होते ते. आणखी एक दोन नावं आठवली… ते संपूर्ण भरतकाम- नक्षीकाम असणारे झब्बे वगैरे घालून भाट-शाहीर सदृश भाषणं देत फिरणारे विद्वान होते. या’पडताळून पहाणं’ वगैरे कामात त्यांचा तसा उपयोग नव्हता. उत्तर शिवशाही- फ्रेंच कॉलनीज्- आणि एकदम पहिल्या पावसानं झाडाची पानं स्वच्छ व्हावी, तसं लख्ख उत्तर राजूला त्याच्याच मनातून उमगलं.
साताळकर!
“पेडण्या, आहे आपल्याकडे एक मॅन असा. चल, स्टुडिओत जाऊन त्यानं याच विषयावर काहीतरी रीसर्च पेपर लिहीलेला पडलाय् माझ्याकडं – तो वाच आणि काय ते ठरव.”
वामकुक्षी उरकून साताळकर राजूच्या स्टुडिओत आले, ते पुन्हा बरोबर चार वाजता. त्याआधी पेडणेकरनं ब-याच गोष्टी उरकल्या होत्या. तो शोधनिबंध त्यानं राजूनं शोधून दिल्यावर पूर्ण वाचला होता.त्यामुळे तर तो प्रभावित झाला होताच, पण दीड-दोनच्या सुमाराला फ्रान्समधे फोन करून त्यानं त्याच्या संभाव्य खरेदीदारांना पडताळणीसाठी साताळकर चालतील का, हे विचारलं होतं. तिघांनाही ते याच विषयातले तज्ञ म्हणून माहिती होते, आणि चालणार होते. खरंतर त्या तिघांनीही त्यांच्याच नावाचा आग्रह धरलेला पाहून तो आणि राजू, जरासे चकितच झाले होते. पुण्यात एका कोप-यात अडीच खोल्यांमधे राहून हा मनुष्य इतका प्रसिद्ध असेल, हे त्यांना जरा नवीनच होतं.
अशा काही खासगी कामाला ते ‘हो’ म्हणतील का? ही राजूलाच जरा शंका होती. पण पेडणेकरनं त्यांच्याशी फोनवरुन बोलतानांच खूप पारदर्शकपणे त्यांना सगळी परिस्थिती सांगितली होती. आणि बाकी काही नाही, तरी त्यांच्याच संशोधनाच्या विषयातलं इतकं महत्वाचं काहीतरी – त्यांना निदान बघण्याची उत्सुकता असणार, हा त्या दोघांचा अंदाज खरा ठरला.
पंधरा ते वीस मिनिटं, साताळकरांनी ते करारपत्र त्याच्या संरक्षक आवरणातून अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढून नीट न्याहाळलं. एक-दोन सेकंद पण ते भावनावशही झालेले राजूला कळले.
“हे जर अस्सल निघालं… तर मराठय़ांच्या इतिहासात फार मोलाची भर पडेल. मराठय़ांच्याच का, फ्रेंचांच्याही. कारण हे करारपत्र म्हणजे मराठय़ांच्या मुत्सद्देगिरीचा नमुना आहे. पण त्याहीपेक्षा भारतातल्या फ्रेंच वसाहतींची अधिकृत सुरुवात, या करारपत्रानं झालेली आहे. म्हणून ते पत्र महत्वाचं. भले मग ते फ्रान्समधे का राहींना ! आजवर फक्त मारतँ म्हणजे आपल्या उच्चारानं ‘मार्टिन’ -नावाच्या एका फ्रेंच अधिका-याच्या डाय-यांमधे त्याचा उल्लेख आला होता. हे अस्सल पत्र प्रत्यक्ष मिळाल्यानं, तहाची कलमं,
इतर अनेक गोष्टी प्रकाशात येतील”. ते म्हणाले.
राजू आणि पेडणेकर, दोघांनीही त्यांचं बोलणं थांबेपर्यंत तोंडातून अवाक्षर काढलं नव्हतं.
“करारनाम्याची तारीख आहे, २५ जून १६९०. जुळतंय. कारण मारत्याँच्या वृत्तान्तात, त्याचा एक अधिकारी- झेरमँ त्याचं नाव. तो हे पत्र घेऊन आल्याचा उल्लेख याच तारखेच्या आसपास आहे. १६८८ पासूनच फ्रेंच लोक पाँडिचेरी मिळावी म्हणून मराठय़ांच्या मागे होते. म्हणजे, जकातीतून माफी, किल्ल्याला तटबंदी करायला परवानगी अशा मार्गांनी. पण त्यावेळच्या अस्थिर राजकीय वातावरणामुळे ते ‘डील’ व्हायला १६९० उजाडलं.”
राजूनं खूप वेळ मनात दाबून ठेवलेली शंका विचारलीच.
“सर.. हे करारपत्र मराठीत कसं काय?… म्हणजे… फ्रेंचाना काय कळणार, त्यात नक्की काय आहे?”
साताळकरांनी ‘बरोबर’ अशा अर्थाची एक हालचाल केली. “रास्त प्रश्न, राजू महाराज. पण हिंदुस्थानच्या भूमीवर पहिले सेटलर्स होते पोर्तुगीज. इंग्लीश, फ्रेंच ही मंडळी तुलनेनं नंतर आली. त्यामुळे मराठीतून पहिले सगळे दुभाषे, निर्माण झाले ते पोर्तुगीजमधे. त्यामुळे एकूणच मराठे आणि परकीय लोक, यांच्यातली पहिली बोली भाषा – लिंग्वा फ्रँका – पोर्तुगीज होती, खूप दिवस. त्यामुळे, अशी करारपत्रं त्यांना कळावीत, म्हणून दुभाषे प्रथम ती पोर्तुगीजमधे अनुवादित करत आणि मग इंग्लीश, फ्रेंच त्या /त्या भाषांमधे त्याचा तर्जुमा केला जाई.”
पेडणेकरचं व्यावसायिक तर्कशास्त्र एकदम उफाळून आलं. “पण सर, याचा अर्थ, त्या दस्तऐवजाचा फ्रेंच म्हणा, पोर्तुगीज म्हणा, रेकॉर्डसमध्ये त्या भाषेत तर्जुमा मिळायला हवा, असं म्हणायचं का?”
साताळकरांनी नकारार्थी मान हलवली. “असंच काही नाही. काही वेळा हे अनुवाद त्या रेकॉर्डसमध्ये सापडतात, काही वेळा नाही. आता या करारपत्राचा कुठं काय तर्जुमा आहे, आजवर फ्रेंचमधे? पण म्हणून ते अस्सल नसेलच, असं काही नाही. ते पडताळायला इतर अनेक कसोटय़ा असतात.”
चारुहास पेडणेकरनं आत्तापर्यंत रोखलेला श्वास सोडला. त्याचा ताणही बऱ्याच अंशी कमी झाला होता. आता तो धंद्याचं बोलू शकत होता. “सो … सर… हॅविंग कम धिस फार, माझी तुम्हाला अशी विनंती आहे, की हे जे काय परीक्षण असेल, ते त्या त्या कसोटय़ांवर, तुम्ही प्रोफेशनली मला करुन द्याल का – आणि त्यासाठी तुमचे चार्जेस कसे काय असतील?” आतापर्यंत कागदावर खिळलेली नजर, साताळकरांनी पेडणेकरच्या नजरेला भिडवली. त्यांच्या डोळ्यात शांत, पण दृढ असा एक भाव होता. “पेडणेकर साहेब….
तुम्ही याचं पुढं काय करणार आहात, ती किंमत अंदाजे किती असेल. हे सगळं तुम्ही मला मोकळेपणानं सांगितलंत, हे मला खूप आवडलं. इन् फॅक्ट, दॅटस् व्हॉट प्रॉम्प्टेड मी टू कम हिअर. देशपांडय़ांचीही ओळख होतीच. या सगळयाचा विचार करून, मला वाटलं या दस्तऐवजाचा अस्सलपणा तपासण्यासाठी सुमारे सहा, आठ कसोटय़ांवर तो तपासावा लागेल. त्यासाठी, तुम्ही मला पाच लाख रुपये, तेही कामाच्या आधी द्यावेत. डॉक्युमेंट अर्थातच विश्वासानं तुम्हाला इथेच सोडावं लागेल किंवा माझ्याबरोबर थांबावं लागेल, १५ दिवस. वेल्, याचं काही ‘अस्सल’ करारपत्र करावंसं तुम्हाला वाटत असेल, तर करु आपण.”
शेवटच्या वाक्याला तिघेही हसले.
“नाही सर… राजूनं तुमचा संदर्भ दिलाय, हे पुरेसं आहे. पाच लाख आणि पंधरा दिवस इज ऑल्सो ओके. माझ्या बायर्सनाही मी तुमचा संदर्भ दिला होता. तीनही बिडर्सना, तुम्ही केलेलं परीक्षण मान्य असेल, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे काही प्रश्न नाही.”
क्षणभर पेडणेकर घुटमळला. “पण सर…मला याचा तुमच्या लेटरहेडवर सविस्तर अधिकृत रिपोर्टलागेल. तो घ्यायला मी येईनच.”
साताळकरांचा तात्काळ होकार आला. “हो .. हो, अर्थातच. अच्छा, म्हणजे तुम्ही थांबत नाही, परत जाताय् मुंबईला. देशपांडेमहाराज, दर तीन दिवसांनी एक एक निकषावर घासून यातलं सत्य बाहेर येत जाईल. ते डिस्कस करायला मी तुम्हाला भेटत राहीन. चालेल, की कंटाळाल?”
“नाही, सर”. राजू म्हणाला. राजूला खूप आनंद झाला होता. एका मोठय़ा घटनेचा -ऐतिहासिक घटनेचा आणि उलाढालीचा, तो साक्षीदार बनत होता. त्याच्याच चांगल्या ओळखीतली दोन तोलामोलाची माणसं काही देवघेव, काही व्यवहार करत होती. आणि ती दोन्ही माणसं राजूला महत्वाची होती.
साताळकरांबद्दलचा त्याचा आदर तर वाढला होताच, पण चारुहास पेडणेकरची पारदर्शक वृत्ती, झटपट निर्णय घेणं, हे ही त्याला पहायला मिळत होतं, आणि आवडत होतं.
“राजू… आपला बर्जोर आहे ना, कोरेगाव पार्क… त्याला मी सांगून ठेवतो. संध्याकाळी, किंवा फारतर उद्या सकाळी — तो तुला कॅश देईल. तेवढी सरांपर्यन्त पोहोचती कर. साताळकर सर, एक रीसीट फक्त द्या त्याची, राजूकडं.”
साताळकर गेल्यावर त्यांनी आपापल्या सिगरेटी पेटवल्या.
“राजू, एक बरंय – ते तुझ्याबरोबर डिस्कस पण करतायत. यू कॅन ऑल्सो हॅव युअर इन पुट्स. चांगलं झालं ना रे, ठरवून टाकलं? काय म्हणतो तू?”
” काही प्रश्नच नाही. पेडण्या, मी त्यांच्या मागे एकदा घरी गेलो होतो. ही वॉझ् ऑलवेज अंडर मॉनेटरी डिस्ट्रेस अँड डेफिसिट. तू त्यांचा तोही भाग थोडातरी हलका केला आहेसच. ऍम शुअर, ही विल डिलीव्हर.”
“वांधा नाही, राजू. आणि काही लागलं तर तू आहेसच. पैशेबिशे सोड. ते आपण त्यांच्यापेक्षाही या फील्ड मधल्या त्यांच्या अधिकाराला दिलेत. फक्त मधून मधून मला एक फोन मारत जाशील?”
“येस… नक्की करीन. जसा त्यांचा रिपोर्ट येत जाईल. चारु, ऑल द बेस्ट फॉर धिस डील.”
पेडणेकर मुंबईला परत निघाला होता.
“एखादा कागद बनावट तयारच केला जातो, तेव्हा त्यामागे काही निश्चित हेतू असतो. मोटिव्ह. आमच्या या डिटेक्टिव्हगिरीच्या सुपारीत, सदर कागद पत्राचे विद्यमान मालक चिटणीस कुटुंबिय, हे हेतूपुरस्सर असं काही करतील असं वाटत नाही” साताळकर बरोबर तिसऱ्या दिवशी येऊन कामाचा आढावा राजूपुढे मांडत होते.
“कुठल्यातरी जमिनीवर, मालमत्तेवर हक्क प्रस्थापित करणं. एखादं मत, किंवा विचारसरणीच्या समर्थनार्थ किंवा विरोधासाठी असे कागद तयार करणं. हे असे मोटिव्ह्ज असू शकतात. त्यातले कुठलेच मुळात या दस्तावेजाला मुळी लागूच नाहीत. ‘दुर्मिळ’ म्हणून विकून पैसे मिळवणे हा हेतू असू शकतो… पण ती खरे-खोटेपणाची पारख आपण करतो आहोतच. चिटणीस फॅमिली तशी वेल्-टू-डू आहे. बनावट कागदपत्रं बनवायला लागणारे प्रचंड कष्ट ते उपसतील ही शक्यता कमीच आहे.”
राजूनं खुणेनंच स्टुडिओतल्या मुलाला चहा आणून ठेवण्याची खूण केली. साताळकरांनी एकदात्याच्याकडे पाहिलं, आणि त्याच संथ आवाजात पुन्हा सुरुवात केली.
“आणखी एका महत्वाच्या गोष्टीची मी खात्री, गेल्या दोन दिवसात केली. ते म्हणजे सदर कागदातल्या मजकुराची भाषेच्या अंगानं खात्री करुन घेतली. बनावट कागद करणा-यांचा तत्कालिन भाषेचा अभ्यास नसल्यामुळे त्यांना त्यातले बारकावे, खाचाखोचा फार माहिती नसतात. घाईत काहीतरी लिहून जातात… आणि एखाद्या साध्या भाषेच्या बारकाव्यात एक्स्पोझ होतात. ह्या राजारामाच्याच एका बनावट पत्रात मागं,”तरी नीट चालीने वागणे, म्हणजे पुढे सर्वतोपरी उर्जिताचे कारण जाणिजे” हे शंकास्पद वाक्य होतं. त्याच्या इतर पत्रातल्या मराठीमधे, “तुम्ही त्यांचे आज्ञेप्रमाणे वर्तणूक करीत जाणे. पुढे स्वामी त्या प्रांती येतील, तेव्हा तुमचे उर्जित करतील”. अशा प्रकारची रचना बहुतांश ठिकाणी आहे. ‘उर्जिताचे कारण जाणिजे’ हा फारसी भाषेचा लहेजा. मराठीसाठी ही अत्यंत विचित्र वाक्यरचना झाली – फारसी पत्रांमधे अशी रचना आहे, असते, ती मराठीत आणून या ‘बनावटकारा’नं खपवण्याचा प्रयत्न केला, पणइतर कसोटय़ांवर तो टिकला नाही.”
“लिपी, विशिष्ट वाक्यप्रयोग, व्याकरण यांही निकषांवर मी सदर कागद पडताळून पाहिला. आज रोजीतरी संशयाला कोणतीही जागा नाही.”
राजू चांगलाच प्रभावित झाला होता. तो कसाबसा बोलला.
” सर… हे जबरदस्त लॉजिक आहे. कामाचा भाग म्हणून नाही, पण मला रस आहे म्हणून… हे लिपी वगैरे तुम्ही म्हणालात, त्याची उदाहरणं सांगा ना – म्हणजे, मला जास्त कळण्यासाठी.”
साताळकरांनी जागेवरच, घातलेली मांडी बदलली.
“ह्यातच पहा ना… किती पैसे, कसे, फ्रेंचांनी द्यावेत, याचा उल्लेख जिथे आहे, तिथे मी बारकाईनं पहात होतो. त्याकाळी ‘५’ हा आकडा मराठीत खूप वेगळ्या पद्धतीनं लिहीला जायचा. सध्या आपणलिहीतो, तो ‘५’ अठराव्या शतकाच्या सुरुवातीला आला. किंवा ‘ऍ’, ‘ऑ’ या उच्चारांचे शब्द मराठीत त्या वेळी नव्हतेच. अर्धचंद्र मराठीत काढला जायला लागला, तोच १८५० साली. साहजिक, त्यातला तसा काही शब्द आला असता, तर आपसूक कागदाचा खोटेपणा सिद्ध झाला असता.”
आता साताळकर येरझा-या घालत होते.
“तारखाही जुळतायत. समकालीन अन्य इतिहासाच्या साधनांमधे, झेरमँ हे पत्र घेऊन आला त्याची तारीख – पाँडेचेरीला पोहोचल्याची – ३ जुलै, १६९० अशी आहे. आणि करारापोटी फ्रेंचांनी द्यायचे पैसे जूनच्या दुस-या आठवडय़ात जिंजीला पाठवले गेले. ही पण नोंद पत्राच्या तारखेला पूरक अशीच आहे. चंदी/ जिंजीला कागद म्हणूनही काही पत्रं मिळतात. पण ती प्रमाण धरली जात नाहीत.”
“तर राजाधिराज देशपांडे, आज इतकं ज्ञानवर्धन पुरे झालं, नाही का ? हा आजच्या तारखेचा माझा रिपोर्ट. आत्ता आपण बोललो, त्या सगळ्या गोष्टी त्यात आहेत. आता भेट आणखी तीन दिवसांनी, निघू मी ?”
तीन दिवस बाकी कामात राजू पार बुडून गेला होता. पण साताळकर, त्यांचं विश्लेषण हे मनात कुठेतरी पार्श्वभूमीवर झंकारत राहिलं होतं.
एकदा त्यानं चारुला फोन केला. पण फार सविस्तर बोलणं झालंच नाही. तोही मुंबईत कामाच्या कुठल्याशा मीटिंगमध्ये होता. चिटणीस कुटुंबियांना त्यानं हे विश्लेषणाचं काम साताळकर पुण्यात करतायत्,इतकं सांगितलं होतं. पण चिटणीस फॅमिलीला ते कोण, हेच माहिती नसल्यानं फारसा फरक पडला नाही.
राजूनंही फक्त काम व्यवस्थित चालू आहे, हा फील पेडणेकरपर्यंत पोचवून फोन ठेवून दिला.
पुढचं साताळकर – सेशन झालं, ते राजूला वाटलं होतं त्याही पेक्षा जास्त रंजक आणि अर्थातच ज्ञानवर्धक झालं. कदाचित डिझायनिंगच्या कामात राजूला वेगवेगळ्या जाडीचे प्रकारचे, गरजेचे कागद हाताळायला लागत, त्याहीमुळे असेल कदाचित, पण सगळी चर्चा राजूला एकदम पटून गेली.
“ह्या बनावटगिरीची, खातरजमा करण्याचा एक मोठा शत्रू…. आणि एक मोठा मित्र महितीये का तुम्हाला, देशपांडे? … कागद. ते डॉक्युमेंट ज्यावर बनवलं गेलं आहे, तो कागद. आता तो मित्र ठरु शकतो, कारण काही वेळा तो कागदपत्राचा खोटेपणा काही सेकंदात उजेडात आणू शकतो. उजेडात, म्हणजे अक्षरशः उजेडात-वाईट होता हो, माझा हा विनोद. इकडे या, खिडकीपाशी.”
सूर्यप्रकाश थेट येणाऱ्या एका खिडकीपाशी त्यांनी राजूला बोलावलं. “हा एक बनावट ठरलेलाकागद, मी मुद्दाम तुम्हाला दाखवायला आणला आहे. हे पहा, मागच्या बाजूनं साधा सूर्यप्रकाश जरी त्याच्यावर पडला, तरी अनेक गोष्टी कळतात. आपण पहातोय, तो नकली कागद, दुस-या कागदाची जोड लावून बनवलेला कळतोय. वरचा भाग अस्सल आहे. पण खालचा जोड लावलेला आहे. नुसतं तेवढंच नाही, तर पागोळ्यांच्या पाण्याखाली तो आधी धरून, नंतर मंद आगीच्या आचेवर तो शेकला आहे.”
राजूला काही फारसा बोध झाला नाही. “कशासाठी, पण सर…?”
“जुना वाटावा म्हणून. बाकी काही नाही. काहीवेळा तर लोक भयंकर कष्ट करतात. तत्कालीन, लोक ज्याला ‘कागदकुटय़ा’ म्हणायचे – कागद तयार करणारा, जी खळ वापरत असे, ती तंतोतंत तशीच करून, कागदावरच्या काही ओळी झाकण्यासाठी किंवा नवीन काही ओळी घुसडण्यासाठी ही खळ कागदाला लावली जाते. पण उजेडात तेही दिसतं.”
राजूला हळूहळू का होईना, कळत होतं. “बरोबर सर. पागोळ्यांचं मातकट पाणी, आणि मंद आगीनं आलेलं बर्नट् टेक्स्चर. कागद जुना वाटणारच. काही म्हणा सर… बनावट पेपर्स तयार करणं, हे जरा जास्तच कष्टाचं काम आहे.”
साताळकर दाद दिल्यासारखे हसले. “पण देशपांडे महाराज, कैक हेक्टर जमिनीची
मालकी वगैरे जर तुम्हाला मिळणार असली, तर त्या लोभानं करणार की नाही तुम्ही इतके कष्ट? आणि आपण जितकं काटेकोर परीक्षण करतोय, तितकं प्रत्येक कागदाचं होईल असं नाही.”
राजूला पटलं, “हो, तेही आहेच. तर थोडक्यात म्हणजे अशी कागदपत्रं करणारे, वेगवेगळ्या वेळी ती करतच रहाणार.”
“बरोबर ! करतच रहाणार. आपल्यासाठी रामदास. “चित्ती अखंड असो द्यावे, सावधपण!…. किंवा जी काय ओळ आहे ती. स्मरण कमी होतंय हो, वयपरत्वे” तो बनावट कागद पिशवीत ठेवून, सरांनी राजारामाचं चालू विश्लेषणातलं पत्र परत हातात घेतलं.
“हे पहा, राजूमहाराज. मराठे वापरत असत तो कागद जुन्नरच्या आसपास बनलेला – एका विशिष्ट पोताचा, जाड आणि खरबरीत असतो. तसा हा आहे. गोव्याकडेही, त्या काळात कागद बनायचा. सगळी युरोपीय मंडळी बहुधा तो वापरायची. मागे मी एक मावळातलं बनावट पत्र… वतनाचं, उघडकीला आणलं होतं, त्यावर चक्क अशा गोवा-मेड कागदाचा वॉटरमार्कच होता. मराठय़ांच्या कागदपत्रांमधे कुठला आला वॉटरमार्क? पडला उघडा खोटेपणा.”
राजूनं विचारलं, “सर… म्हणजे या निकषांवर आपलं पत्र – करारपत्र अस्सल ठरतंय असं म्हणायचं का?”
“अजून नाही. त्याचा कागद तेवढा अस्सल मराठेकालीन, राजारामाच्या वेळचा आहे, हे नक्की…गोंधळलात ! अहो, बऱ्याच वेळी पळापळ, युद्ध या धामधुमीत अस्सल शिक्के मारलेले कोरे कागद तयार करून ठेवले जायचे, घेऊन गेले जायचे मुक्कामी. असा एखादा कागदही कुणाच्या हातात पडू शकतो.पेशवे दप्तरात अजूनही असे अस्सल, कोरे कागद मधूनमधून सापडतात. तसा कागदही बनावट दस्तऐवजतयार करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.. त्यामुळे पत्राच्या अस्सलतेचं अनुमान नाही निघत.”
राजूला प्रकाश पडला. त्या अंगानंच बहुतेक साताळकर कागदाला शत्रू म्हणाले असणार.
“पण मग आपला निष्कर्ष काय.. म्हणायचा ?” त्यानं विचारलं.
“राजू महाशय… आज रोजी निष्कर्ष काही नाही. कागद मात्र अस्सल आहे.”
पुढे ते म्हणाले,”अरे हो, ते सांगायचं राहिलं. कागदाची जाडी, विदिन टॉलरेबल लिमिट्स सगळीकडे सारखी आहे. मायक्रोमीटर असतो ना, आपल्या शाळेच्या प्रयोगशाळेत, तो लावून मी किमान तेवीस ठिकाणी त्याची जाडी मोजली, हा लेटेस्ट रिपोर्ट. चहा कुठे आहे, हो? का आपण बाहेर जाऊन घेऊ या?”
त्या दिवशी मात्र ते गेल्यावर राजूनं चारूहास पेडणेकरला फोन लावला. त्याला चढत जाणारं टेन्शन, त्याची निरीक्षणं हे या बाबतीत चारू सोडून तो कुणाशीच शेअर पण करु शकत नव्हता. फोनवरचं त्याचं बोलणं ऐकून पेडणेकर प्रचंड मनापासून गदगदून हसला. राजूचं, त्यानं या केसचं घेतलेलं टेन्शन बाहेर पडत होतं.
“पेडण्या, लेका तुझ्या कृपेनं मी अगदी डॉ. वॉट्सन का वॅटसन त्याच्या रोलमधे जाऊम पडलोय. होम्स वरच्या पिक्चरमधे किंवा संगीत नाटकात बोलणं-गाणं ऐकणारं पात्र असतं ना, त्या रोलमध्ये, सारखं त्या परफॉर्म करणा-या कडं कौतुकभरल्या, अप्रीशिएटिव्ह नजरेनं बघत रहायचं ! च्यायला ! ऑफ कोर्स, इतकं वाईट नाहीये म्हणा सगळं. इट्स क्वाईट इंटरेस्टिंग. पण चारु, जड होतं ना कधी कधी.”
“ए वॅटसन्, तुला मजा येतीय ना? बस्. आणि आता होतच आलंय, म्हणतोस ना? आणखी एक- दोन सेशन्स. जर अंदाज घे. मी पण येऊ शकतो पुढच्या आठवडय़ात पण मी एकदम फायनल रीपोर्टलाच येईन, असं म्हणतो. काय बोलतो तू?”
“व्हेन एव्हर, चारु. आत्ता तरी काही अडचण नाही. च्यायला पेडण्या, तुला काही उत्सुकता वाटत नाही का रे?… हे डॉक्युमेंट ओरिजनल निघेल, फेक निघेल, याची?”
“काय आहे ना, राजू – ऍण्टिक गॅलेरियातल्या येणा-या आणि जाणा-या प्रत्येक प्रॉडक्ट आणि आर्टेफॅक्टवर मी असा जीव लावून बसलो, तर धंदा कधी करु? घोडा अगर घास से दोस्ती करेगा, तो खायेगा क्या ? पण एक नक्की आहे. मी मराठी असल्यामुळे असेल किंवा तज्ञ म्हणून साताळकरांसारखा इंटरनॅशनल रेप्यूटचा एक्सपर्ट असल्यामुळे असेल मला ते डॉक्युमेंट खरं-खोटं निघेल, त्यापेक्षाही ही ऍनालसिस फेज् आहे ना, तीच जास्त इंटरेस्टिंग वाटते. आय होप, यू ऍग्री ! त्यासाठी पाच लाख इज् ओके. वुई लर्न.”
तिस-या बैठकीला साताळकर खूपच गंभीर दिसत होते. आल्यावर बाकीचं, इकडचं -तिकडचं काही न बोलता ते थेट विषयावर आले आणि राजूला जाणवलं, की ते नेहमीसारखे ऐसपैस बोलत वावरत नाहीयेत. काहीतरी सूक्ष्म ताण त्यांच्यावर दाटून आहे. तो ऐकत राहिला.
“तर आज. गेले तीन दिवस मला बरेच सोर्सेस हुडकावे, व्हेरिफाय करावे लागले आहेत. याचं कारण, गेल्या तीन दिवसांत मी एका महत्वाच्या निकषावर काम करत होतो. ज्याचा परिणाम आपल्या निर्णयावर फार मोठय़ा प्रमाणावर पडणार आहे. हा घटक, म्हणजे शिक्का. द ऑफिशियल सील ऑफ राजाराम. धिस सिंगल एलेमेन्ट, मिस्टर देशपांडे, कॅन बी अ डिसायडर – इन सर्टन केसेस….. टू अ लार्ज एक्स्टेंट”.
राजू पूर्ण एकाग्र होऊन ऐकत होता. साताळकरांनी आपल्या बॅगमधून, काही मोठे ताव काढले. वेगवेगळ्या शिक्क्यांचे काही ठसे त्यावर उमटवलेले दिसत होते.
“तुम्हाला ना देशपांडे, बाकी सगळं आहेच पण हे जास्त इंटरेस्टींग वाटेल. ऐतिहासिक शिक्के, मोर्तब, सील्स यांचा अभ्यास. sigillography ज्याला म्हणतात, ते.”
त्यांनी काही वेळ बोलणं जुळवण्यासाठी घेतला.
“लुक.. इन अवर केस… घोळ जरा जास्त होता. कारण राजारामचे तीन शिक्के आजवर प्रकाशात आले आहेत.. तीन विशिष्ट कालखंडांमध्ये वापरलेले. हा पहा त्याच्या पहिल्या शिक्क्याचा ठसा. चौकोनी आकार. राजूनं पाहिलं. “श्री राजा । राम छ। त्रपति।” हा मजकूर तो वाचू शकला. साताळकरांनी दुसरा एक ठसा दाखवला. तो वर्तुळाकृती होती. “बघा, वाचता येतंय का.”
राजूनं पुन्हा निरखून पाहिलं. “श्री धर्मप्र। द्योतिताशेषव । र्णादाशरथेरिव। राजारामस्य मुद्रे। यंविश्ववंद्या। विराजते।”… मजकूर वाचायलाच त्याला वेळ लागला.
साताळकर सांगत होते. “दुसरा शिक्का आपल्याला हव्या त्या कालखंडात जास्तीत जास्त वापरला गेला आहे. आणि आपल्याही डॉक्युमेंटमधे तोच वापरलेला दिसतो आहे. तिथे ही जुळतंय. तिसरा शिक्का, रामराजे जिंजी मुक्कामाहून परतल्यावर वापरायचे तो ..पण, पण त्याचा आपला संबंध नाही.”
राजूनं होकार भरला..”इंटरेस्टिंग. पण मग शिक्का अशा केसेसमध्ये ‘ डिसायडर’ कसा काय ठरतो, सर?”
“आपल्या केसपुरतं बघायचं, तर या तीनातला बरोबर कुठला शिक्का पत्राच्या कालावधीत वापरायचा, हे सर्वसामान्य बनावटकाराला कळणं तसं दुरापास्त म्हणावं लागेल. जरी त्यानं तसंही केलं… तरी बाकी कसोटय़ांवर तो कागद सर्वतोपरी ‘पास’ होणं अवघड आहे.
“खरं तर नकली कागद तयार करण्यासाठी हा पळापळ, पाठलाग, धामधूम असणारा मराठय़ांचा संघर्षमय कालखंड सर्वथैव योग्य आहे. मोगलांचा ससेमिरा चुकवण्यासाठी, आणि स्वराज्याची ज्योत तेवती ठेवण्यासाठी राजाराम काही निवडक लोकांबरोबर दक्षिणेकडच्या मराठी मुलुखात निघून आला होता. पण महाराष्ट्रातही त्याचा कारभार, पत्र व्यवहार, वतनपत्रं देणं चालू होतं. याच गोष्टीचा फायदा घेऊन काहीतत्कालिन लोकांनी बनावट पत्रांची निर्मिती केलीही होती. तशी बनावट वतनपत्रं उजेडात आलीही आहेत.
पण जेव्हा आपण शिक्के, ठसे हे बघतो, तेव्हा नुसतं विलग स्वरुपात त्यांच्याकडे पहात नाही. बाकी सगळ्या घटकांची, बनवणाऱ्याला माहिती असण्याची शक्यता फार दुरापास्त. दुसरं, शिक्का खरा की बनावट हे ठरवतांना कागदावर तो कसा उमटला आहे, त्यावर खूप अवलंबून असतं. त्या कागदाचा मऊ किंवा खडबडीतपणा, त्या कागदाची तत्कालिन शाई शोषण्याची क्षमता, उमटवतांना दिला गेलेला दाब अशा अनेक गोष्टी त्यात येतात. खरंतर एकच शिक्का दोन ठिकाणी उमटवला, तर या प्रत्येक बाबीत, दरवेळी थोडाफार फरक पडतोच. पडायलाच हवा. बऱ्याच वेळी अस्सल शिक्का ‘परफेक्ट’ कधीच उमटलेला नसतो. जर जास्त स्पष्ट उमटलेला वाटला. म्हणजे कागदाच्या तुलनेत – तरच काही गोंधळ असण्याची शक्यता अधिक.”
…. आलेला चहा त्यांनी स्वतःच दोन मग्जमधे ओतला. “घ्या”.. तेच राजूला म्हणाले.
राजूच्या मनात विचार आला. बरंय् असल्या हेवी स्टफला सरावलो आपण. पहिल्या दिवशी म्हणजे झिणझिण्या आल्या असत्या डोक्याला. पण त्यानं पुन्हा लक्ष ऐकण्यावर केंद्रित केलं.
“पणा दोन ठिकाणी वेगळा उमटला, म्हणून केवळ शिक्का बनावट ठरत नाही, ते मी आत्ता म्हणालो त्या सगळ्यामुळं. निर्णायक कसोटी असते, ते एखाद्या पुराव्यानिशी शाबित झालेल्या कागदावरच्या अस्सल शिक्क्यातल्या रेषांचे परस्परसंबंध – म्हणजे त्यातली अंतरं, त्यातले कोन, रेषांची परस्परांमधली अंतरं हे तंतोतंत आपल्या ‘टेस्ट’ केसशी जुळणे. ही निर्णायक गोष्ट”. आणि जवळ जवळ कलाकारांनं दाद घेण्यासाठी पहावं, तशी नजर त्यांनी राजूला दिली. “गेल्या तीन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर आज मी हे निश्चित म्हणू शकतो, की सदर दस्तऐवजावरच्या राजारामाच्या मुद्रेत, शिक्क्यात कोणतीही गफलत नाही. कोणताही घोटाळा नाही.”
राजू थक्क होऊन ऐकत होता. पण त्यांचं बोलणं संपलंय, हे लक्षात आल्यावर एक शंका त्यानं
मनात गच्च धरून ठेवली होती, ती विचारली, “सर… धिस् इज सिंपली ग्रेट. पण तुम्ही ते चंदी… का जिंजी पेपर्स ऑथेंटिक नाहीत म्हणाला ते… यापैकीच हे डॉक्युमेंट नाही ना? मागे तुम्ही म्हणाला होता.”
साताळकरांनी काही सेकंद त्यांचा रीपोर्ट चाळला. “मी लिहीलंय याच्यात. फारसं प्रमाण न ठेवता राजारामानं दिलेली पत्रं,- ‘चंदीचे कागद’, ही बहुतांश वतनपत्रं आहेत. एकतर्फी. या डॉक्युमेंटचं तसं नाही. हे द्विपक्षी करारपत्र आहे. त्यात उल्लेख केल्यानुसार मराठय़ांना पैसे मिळालेले सिद्ध झाले आहेत.फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीच्या हिशेबांमधे त्याचा उल्लेख आहे. Diaries of Francois Martin मधेही ते तपशीलआहेत. त्यामुळे हे पत्र ‘चंदीचे कागद’ म्हणतात, त्यापैकी निश्चितपणे नाही. बाय् द वे – जिंजीचंच मराठीत नाव ‘चंदी’ आहे.”
बोलून दमल्यामुळं की काय, त्यांनी खुणेनंच राजूला आणखी एक ताव दाखवला.
“ही राजाराम काळातली पत्रसमाप्तीची खूण – मोर्तब. म्हणजे शिक्काच, एक प्रकारचा. फक्त तो पत्राच्या शेवटी उमटवला जातो. आपल्या कागदातली मोर्तब देखील सर्व कसोट्यांवर.. मी मगाशी म्हणालो त्याच उतरली आहे. ”
राजूच्या अंगावर जवळपास काटा आला होता. घाई करायची नाही, असं पन्नासवेळा आधी मनाशी घोकून देखील, त्याच्या तोंडून नकळत प्रश्न निसटलाच.
“म्हणजे, सर… हे अस्सल आहे. .. बरोबर? वुई आर ऑल मोस्ट कन्क्लुडिंग! बरोबर ना सर ?”
उत्तर देतांना साताळकरांनी काही सेकंद वेळ घेतला. एक मोठा निश्वास टाकून ते म्हणाले,
“जवळजवळ. पण माझ्यातला हिस्टोरिअन, परफेक्शनिस्ट आणि माझ्यातला एक कायम असमाधानी माणूस यांचं द्वंद्व – मला ठाम निष्कर्षाप्रत येऊ देत नाहीये. पण नव्व्याणव टक्के हे अस्सल आहे.”
राजूला फारसा बोध झाला नाही. “पण मग.. सर.. व्हॉटस्, द नेक्स्ट प्लान?” म्हणजे .. मला खूप उत्सुकता आहे म्हणून. कागद, शिक्का, भाषा, मोर्तब, फॅक्टस्… सगळंच जुळतंय, तर मग?”
साताळकरांनी हाताची चाळवाचाळव केली.
“बरोबर आहे. आता फारसं काही उरत नाही. एक काम करा ना… आज बुधवार. तुम्ही शनिवारी पेडणेकरांना बोलावून घ्या… सगळे परीक्षणाचे घटक तर अस्सल आहेत या कागदात. पण, बीफोर मेकिंगद स्टेटमेंट, मी ते जरा परस्परसंगतीनं, एकमेकांशी ताडून बघतो. बाय द वे, हा आजचा रिपोर्ट आणि ही माझ्या पाच लाखांची पक्की पावती.”
त्यांनी प्रेमानं राजूच्या खांद्यावर हात ठेवला. “तुम्हाला बराच त्रास झाला. खूप ऐकून घेतलंत, मला हुरूप दिलात. येतो मी; आता एकदम शनिवार सकाळ-अकरा वाजता. ठीक?”
शनिवारी साडेनऊ वाजताच, द्रुतगति महामार्गावरुन भयंकर द्रुतगतीने येऊन पेडणेकर राजूच्या स्टुडिओत पोचला. सातळकरांनी दिलेली रीसीट, त्यांचे दिवसागणिक केलेले रिपोर्टस्. हे सगळं एक नजरटाकून त्यानं बॅगेत कोंबलं.
“धिस् ऑल स्टफ इज ऑल राईट, राजू. उघडच आहे, की ते डॉक्युमेंट ऑथेंटिक आहे.
पण मला ते साताळकरांकडून ऑफिशियली ऐकायचंय. पण ते म्हणाले, तेही बरोबरच आहे. ह्या सगळ्या कसोटय़ांचा, घटकांचा एकमेकांशी मेळ बसला पाहिजे. आय थिंक, ही इज् जस्टीफाईड. तरी भेंडी, अकरा कधी वाजतायत असं झालंय.”
अकरा वाजतांना, साताळकरांच्या आधी एक वेगळाच चौदा पंधरा वर्षांचा मुलगा स्टुडिओत येऊन उभा राहिला. पेडणेकर आणि राजू, दोघे ही आपापल्या परीने पण एकाच विषयाच्या विचारात मग्न होते, त्यामुळे तो काय म्हणतोय, हे त्यांना कळायला काही सेकंद लागले.
“राजू देशपांडे साहेबांसाठी साताळकर सरांनी दिलंय.” असं एक ब-यापैकी मोठं फुलसाईझ् पाकीट समोर ठेवत तो म्हणाला,” पोचल्याची या कागदावर सही द्याल?” त्यानं निरागसपणं विचारलं.
राजू चांगलाच भांबावला होता. साताळकरांचं प्रत्यक्ष न येणं, त्याच्या अंतर्मनाला अभद्र वाटलं होतं. काहीतरी जबरदस्त घोटाळा होत होता. आजारी वगैरे नसतील ना ते ? त्याला एकदा, आणि एकदाच वाटून गेलं. “सर.. कुठायत पण ?” त्यानं कसंबसं विचारलं. मुलाचे ‘माहित नाही’ हे शब्द त्याला फार लांबवरून आल्यासारखे वाटले.
त्यातल्या त्यात भानावर होता, तो चारूहास पेडणेकर. भांबावून वगैरे न जाता, त्याच्या हालचालीत धोका जाणवलेल्या एखाद्या मांजराची अस्वस्थ सहजताच आली होती. सही करुन, त्या मुलाला वाटेला लावून, पहिलं त्यानं ते पाकीट उघडलं. त्याच्या आत एक पत्र, आणि आणखी एक बंद पाकीट होतं.
“कम ऑन राजू… फेस इट. वाच तरी त्यांनी काय लिहीलंय. घाबरतो काय?” पेडणेकर करवादला.
अत्यंत सुवाच्च अक्षरात, रेघा असणा-या ए फोर लेटरहेडवर पत्र होतं. राजू आणि पेडणेकर ,दोघांनाही उद्देशून.
प्रिय श्री. पेडणेकर आणि सन्मित्र राजू देशपांडे,
यांस स.न.
स्वतः न येता पत्र पाठवण्याचं प्रयोजन इतकंच, की समोर आलो असतो, तर कदाचित इतक्या स्पष्ट, मोकळेपणानं मी तुम्हाला हे काही सांगू शकलो नसतो.
फर्स्ट थिंग्ज फर्स्ट. आपल्या विश्लेषणातला एक अभ्यास घटक, मी मुद्दाम बाजूला ठेवला होता. तो म्हणजे कागदपत्रात वापरलेली शाई. अस्सल मराठा कागदपत्रं, त्यावेळी फक्त काळ्याच शाईत लिहीली जात. आपल्या सदर कागदपत्रातही शाई काळीच आहे. पण ती रुई वगैरे झाडांचा चीक, इतर काही घटक वापरून केलेली मराठेकालीन शाई नाही. अशी शाई कशी तयार केली जाते, ते मला माहित आहे. पण हेतुपुरस्सर हे वैगुण्य आपल्या विश्लेषणातून, परीक्षणातून मी गाळलं. कारण लौकरच कळेल. या करारपत्रातली थोडी
शाई खरवडली आणि x-ray diffraction, Polarised light microscopy किंवा HPLC सारखी तंत्रं वापरून जर तिचं रासायनिक विश्लेषण केलं. तर त्यात अँटाज्… म्हणजेच टीटॅनिअम डायऑक्साईडचं, एका आधुनिक रसायनाचं, विशुद्ध स्वरूप वापरलं गेलं आहे, हे कुणालाही लक्षात येईल. दिसतांना ती मराठेकालीन वाटली, भासली तरीही. भारतात कदाचित् कुणी इतक्या पुढंपर्यन्त जाऊन कुणी इतकं विश्लेषण करणारनाही. पण फ्रान्समध्ये जर कुणी अभ्यासकानं ते केलं, तर विकणारे म्हणून पेडणेकरांची, प्रमाणित करणारा
म्हणून माझी, आणि आपण दोघे भारतीय, म्हणून आपल्या देशाची काय इभ्रत राहील? जे पत्र विश्लेषणासाठी तुम्ही मला दिलंत, ते म्हणजे एक वरच्या दर्जाची केलेली मोठी फसवणूक आहे…
ते पत्र बनावट आहे.
अँटाज हा त्याच्या शाईचा घटक १९१७ मधे विशुद्ध स्वरुपात प्रथम मिळाला. बाकी गोष्टी कितीही अस्सलअसल्या, तरी ही अँटाझयुक्त शाई, राजाराम काळात असणारच नाही.
मग प्रश्न असा पडतो, की मी हे विश्लेषक म्हणून तुम्हाला आमनेसामने का सांगितलं नाही ? उत्तर ऐकून कदाचित तुम्हाला खूप विषण्ण वाटेल.
या बनावट दस्त ऐवजाचा निर्माता, जनक, मीच आहे. मीच ते बनवून चिटणीस कुटुंबियांना विकण्यासाठी दिलं होतं.
एखाद्या कुशल चित्रकारानं आपली सही पेंटिंगखाली करावी, तशी या बनावटपत्रात शाई मात्र मी मुद्दामच या काळातली वापरली. आज पेडणकरांना ते विकून मला भरपूर पैसे कमवता येत होते. पण तरीही तसं न करण्याचाच निर्णय, शेवटी मी घेतला. खूप विचारांती.
खरोखर – श्रेयस आणि प्रेयस, यिन् आणि यांग, सप्रवृत्ती आणि दुष्टप्रवृत्ती यात निवड करणं किती अवघड आहे.. किंवा काही वेळा आपल्या मनाचा लंबक कोणत्या बाजूला जाऊन स्थिरावेल, हे सांगणं ही फार अवघड गोष्ट आहे. नैराश्य, कडवटपणा मिळालेली दारूण उपेक्षा, संगणक सोडून इतर ज्ञानशाखांबद्दलची समाजातील उदासीनता… या सगळ्यांवर मी एका क्षणी विलक्षण संतापलो होतो. मला या समाजावर माझ्या बुद्धीच्या आधारानं कुरघोडी करुन विजयाचं समाधान आणि हो, त्यातून भरपूर संपत्ती, भरपूर पैसा पण हवा
होता. ज्या क्षणी संशोधनादरम्यान राजारामाची शिक्का मोर्तब असणारे चार दोन अस्सल, कोरे कागद मला मिळाले, तेव्हाच माझा हा विचार पक्का झाला होता. ज्या जगात माझी, माझ्या कामाची उपेक्षा होते, आणि दिवसभर डे-ट्रेडिंग, फॉरवर्ड ट्रेडिंगच्या आकडय़ांवर डोळे लावून बसलेले परजीवी सटोडिये उजळ माथ्यानं पैशाचा माज करतात – त्या जगाला – मला, माझी स्किल्स वापरून केलेली एक ‘कलाकृती’ बहाल करायची होती.
पण ज्या विश्वासानं राजू देशपांडे पेडणेकरांना घेऊन माझ्याकडे आले, त्याचं काय? ज्या विश्वासानं एका शब्दानंही खळखळ न करता मागताक्षणी पेडणेकरांनी पाच लाखाची व्यवस्था केली, त्याचं काय? आणि फ्रान्समधले तुमचे तीन बाय बायर्स माझ्या नावाला अथॉरिटी म्हणून मान्यता देतायत, त्याचं तरी काय? आणि आजवरच्या सडेतोडपणामुळे, निस्पृहपणामुळं जे काही थोडंफार नाव माझंही घेतलं जातं,त्याचं काय?
माझी फार चलबिचल झाली. देशपांडे, आपली या मागची भेट झाली, तेव्हा मी तुम्हाला एकदा म्हणालो होतो ना, माझ्याच मनात एक द्वंद्व चालू आहे ?
हीच ती सगळी खळबळ होती. एकीकडे आजवर कधी बघितली नाही, आणि पुन्हा कधी बघायला मिळेलसं वाटत नाही, अशी संपत्ती आणि दुसरीकडे – आयुष्याचं प्रयोजनच जणू दानाला लागलेलं. इतकी वर्ष, प्रसिद्धीपासून लांब राहून, व्रतस्थपणे केलेल्या कामाशी, मिळवलेल्या नावाशी बेईमानी. निर्णय घेतांना त्रास तर झालाच. पण कुठल्याशा अदृश्य प्रेरणेनं म्हणा किंवा आजवर बघितलेल्या, मिळालेल्या, अनुभवलेल्या संस्कारांचं बळ म्हणा, मी ‘याच’ बाजूला राहायचं ठरवलं.. सत्प्रवृत्ती.
आणखी एका रहस्याचाही उलगडा करून, हा पत्रप्रपंच पूर्ण करतो.
सोबतचं बंद पाकीट श्री. पेडणेकरांसाठी. ज्या मूळ, अस्सल करारपत्रावरुन मी हा बनावट दस्तऐवज तयार केला, ते मूळ अस्सल पत्र त्यात आहे. मलाच मागे ते सापडलं होतं. वालादोर – कडलोर भागातल्या फ्रेंच वसाहतींच्या अवशेषांचा अभ्यास करतांना एका म्हाता-या इंडो-फ्रेंच, मिश्र पालक असणा-या माणसाकडे मला ते सापडलं होतं, फक्त कुठलं संग्रहालय, संस्था यांना ते देऊन न टाकता, का कुणास ठाऊक मी ते माझ्याकडेच ठेवलं होतं. त्याची किंमत, पेडणेकरांना वाटते त्याहूनही जास्त मिळेल कदाचित.
माझ्यामुळे पेडणेकरांना बराच त्रास झाला. ही त्याची भरपाई आहे. तुमच्या बायर्सकडून याचे जे पैसे येतील, त्यातले योग्य वाटतील, तितके मला द्यावेत.. पाच लाख तर त्यातले माझ्याकडे आहेतच!
मी खूप दमलो आहे. खूप शोषला गेलोय या यिन-यँग अन् श्रेयस् प्रेयस् मधल्या द्वंद्वाला. थकायला झालंय. या सगळ्या लढाईत शक्तिपात जर जरूर झालाय- पण बुध्दिभेद तर झाला नाही, हे काय कमी आहे? आता काही दिवस हिंडून येतो जरा. मासुलीपट्टण पासून चंद्रनगर पर्यंत पूर्व किना-यावर अजूनही डच-फ्रेंच वसाहतींच्या इतिहासातले कैक मुद्दे, कैक स्थळं दुर्लक्षित आहेत. ती बघून येतो. त्यातूनच मला जरा विश्रांती मिळेल.
देशपांडय़ांना परत आल्यावर भेटेनच. इतका निरलस, निःस्वार्थी मित्र उतारवयात सामोरा येईल,असं वाटलं नव्हतं.
बहुत काय लिहीणे ? आमचे अगत्य असो द्यावे.
लेखनसीमा
रघुनाथ साताळकर
पुणे